इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंचायती राज मंत्रालयाने 2022-2023 या मूल्यमापन वर्षासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे. तळागाळातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी देशभरातील पंचायती राज संस्थांच्या अनुकरणीय प्रयत्नांची दखल घेऊन दिले जाणारे हे पुरस्कार उत्कृष्टतेचा मापदंड समजले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करण्यात येणार आहेत.
यावर्षी विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे, जे तळागाळातील प्रशासन आणि समुदाय विकासातील यशस्विता विस्तृतपणे प्रतिबिंबित करतात. या श्रेणींमध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार, ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार गरिबी निवारण, आरोग्य, बालकल्याण, पाण्याची पुरेशी उपलब्धता, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि हवामान शाश्वतता यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात.
यावर्षी 1.94 लाख ग्रामपंचायती स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. 42 पुरस्कारप्राप्त पंचायतींपैकी 42% पंचायती महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत. काटेकोर निवड प्रक्रियेमध्ये ब्लॉक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या 5 विविध समित्यांकडून शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाशी (एल एस डी जी)संरेखित विविध संकल्पना क्षेत्रातील पंचायतींच्या कामगिरीचे सखोल मूल्यांकन समाविष्ट होते. ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच पंचायती राज संस्था /ग्रामीण स्थानिक संस्था यांच्यात स्पर्धात्मक भावना वाढवण्यासाठीच्या मंत्रालयाच्या अटल वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.