इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सासू सुनेचे नाते हे जगजाहीर आहे. अनेक ठिकाणी कजाग सासू या भित्र्या सुनेचा छळ करतात, तर काही ठिकाणी बिलंदर सूना या गरीब सासूनां त्रास देतात. मात्र आजच्या काळात काही ठिकाणी सासु सुनेचे नाते हे आई व मुली सारखी असते, असेही दिसून येते. असाच प्रकार मध्य प्रदेशातील एका गावात आढळून येतो.
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील पनवार चौहानन ग्रामपंचायतीत गावकऱ्यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. सासूची निष्ठेने सेवा केल्याबद्दल येथे गावकरी सुनेला बक्षीस देतात. ज्यांनी सासूची मनापासून सेवा केली, अशा सुनेचा सन्मान करण्यात येईल, असा ठराव ग्रामसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्यात आली असून ती अशा सुनांची छाननी करून त्यांची निवड करते.
ग्रामपंचायतीमध्ये गावातील सून ३५ वर्षीय राजकुमारी यादव यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. राजकुमारीचा पती राज बहादूर यादव कामानिमित्त बाहेर राहतो. मात्र तिचे जेव्हा सासरे शिवनाथ यादव ( वय ६७ ) यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा राजकुमारीने प्रथम घरी प्राथमिक उपचार केले.
सासऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणीही सापडले नाही, तरीही तिने हिंमत गमावली नाही. त्यांना घेऊन तिने एकटीला जबलपूर येथील खासगी हॉस्पिटल गाठले. तसेच तिला आयुष्मान कार्डने उपचार घेण्यासाठीही संघर्ष करावा लागला. अखेर सासऱ्याचे उपचार पूर्ण करून तिने घरी आणले. आता शिवनाथ यादव हे पूर्णपणे निरोगी आहेत.
राजकुमारीचा दिनक्रम सकाळी सासूच्या आशीर्वादाने सुरू होतो. यानंतर ती त्यांच्यासाठी चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करते. आता राजकुमारी गावातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
दरम्यान, गावचे सरपंच वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ३२०० आहे. गावात अनेकदा सासू-सून यांच्यातील भांडण घराबाहेर पोहोचले. या भांडणात भावा-भावाचे नाते बिघडले आणि कुटुंबे तुटली गेली आहेत.
परंतु आता जवळपास दोन महिन्यांपासून घराघरांत अशी भांडणे, मारामारी होत नाहीत. यावेळी पुरस्कार मिळावा, अशी स्पर्धा महिलांमध्ये आहे. अशा स्थितीत सासू-सासऱ्यांची सर्वच सून काळजी घेत असतात. तसेच हा पुरस्कार सरपंच स्वतः देतात.