हरिद्वार (विशेष प्रतिनिधी) – भारतीय संस्कृतीची हजारो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, शक्यतो सर्व नियमांचे यथाशक्ती पालन करीत, हरिद्वारच्या कुंभमेळ्याचा आज सोमवती अमावास्येला शुभारंभ झाला. शैव आणि वैष्णव अशा तेराही आखाड्यांच्या साधु – महंतांनी “हरि की पौडी” येथे पवित्र गंगेत पहिले शाहीस्नान केले. सारे जग कोरोनाशी लढत असतांनाही आखाड्यांच्या पवित्र देवतांचे स्नान चुकता कामा नये, म्हणून आम्ही साधु- महंतांनी, विश्व कल्याणाचा संकल्प करीत शाहीस्नान केले, अशी माहिती अखिल भारतीय पंच दशनाम आनंद आखाड्याचे सचिव स्वामी गणेशानंद सरस्वती यांनी इंडिया दर्पण शी बोलताना दिली.
पहिल्या शाही स्नानासाठी परंपरेनुसार श्री निरंजनी आणि आनंद आखाड्यांच्या नेतृत्वाखाली शाही मिरवणूक निघाली. भस्म लेपनाबरोबरच मास्क घातलेल्या साधूंचे दर्शन प्रथमच जगाला होत होते. साधूंच्या स्नानानंतर भाविकांनी गंगेच्या दोन्ही काठावर डुबकी मारली. नेहमी लक्षावधींची संख्या असलेल्या भाविकांची यावेळची उपस्थिती कमीच होती. शासनाने सर्व भाविकांची कोरोना टेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी रविवारी, अमावस्या मुहूर्त सुरु होताच गंगेच्या काठी १५१ शंखांचा घोष करण्यात आला. हिमालयाचे वातावरण या नादाने भरून गेले होते.
बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=363882544930644