नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या वैज्ञानिक क्षमता वाढविण्याच्या आणि नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देश या वर्षी आपली पहिली मानवासहित पाण्याखाली अतिखोलवर जाणारी पाणबुडी (खोल समुद्रात चालणारे मानवयुक्त वाहन) लाँच करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अवकाश, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे.
“डीप ओशन मिशन” वरील मोहीम सुकाणू समितीच्या दुसऱ्या बैठकीत बोलताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी या उपक्रमाच्या क्रांतिकारी स्वरूपावर भर दिला. या उपक्रमामुळे भारताला अशा महत्त्वाकांक्षी प्रयत्नांसाठी तांत्रिक कौशल्य असलेल्या सहा राष्ट्रांच्या निवडक गटात स्थान मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सुरुवातीची पाणबुडी 500 मीटर खोलीपर्यंत चालेल आणि पुढील वर्षापर्यंत 6,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचणारे वाहन निर्माण करणे हेच ध्येय असेल, असेही ते म्हणाले. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या कालमर्यादेशी जुळलेली आहे असून देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासातील एक “सुखद संयोग” आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला डीप ओशन मिशन हा एक प्रमुख कार्यक्रम असून स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी दोनदा हा उपक्रम अधोरेखित केला आहे.
हा संपूर्ण उपक्रम स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून पूर्णपणे भारतात विकसित आणि उत्पादित केला जातो. हा उपक्रम अत्याधुनिक विज्ञानात देशाच्या स्वावलंबनाचे प्रदर्शन करतो, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेचा उद्देश खोल समुद्रातील परिसंस्थांचे आकलन वाढवणे हा आहे. यामुळे शाश्वत मत्स्यपालन आणि जैवविविधता संवर्धनात योगदान मिळते. या पाण्याखालील संपदेचा वापर करून, भारत आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, वैज्ञानिक समुदायासाठी आणि पर्यावरणीय लवचिकतेसाठी दीर्घकालीन फायदे मिळवण्यास सज्ज आहे.
कोरोना महामारीमुळे डीप ओशन मिशनला विलंब झाला, परंतु डॉ. जितेंद्र सिंग यांनी उपक्रमात झालेल्या प्रगतीबद्दल आशावाद व्यक्त केला. हा उपक्रम भारताच्या दृढनिश्चय आणि नाविन्यपूर्ण भावनेचे प्रतीक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. त्यांनी येत्या काळातल्या देशाच्या अद्वितीय दुहेरी कामगिरीवरही प्रकाश टाकला, ज्यात एक भारतीय अंतराळात प्रवास करत आहे तर दुसरा समुद्रात खोलवर गेला आहे, हे अवकाश आणि सागरी अन्वेषणात देशाच्या अतुलनीय प्रगतीचे सूचक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.