मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॅन कार्डधारकांना आता आधार कार्डसोबत पॅन लिंक न केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड 500 रुपये होता. प्राप्तिकर कायद्याच्या अलीकडे जोडलेल्या कलम 234H नुसार (मार्च 2021 मध्ये वित्त विधेयकाद्वारे जोडले गेले), पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तथापि, आयटीआर भरणे, रिफंडचा दावा करणे आणि आयकर संबंधित इतर कामांसाठी अशी पॅन कार्ड मार्च २०२३ पर्यंत कार्यरत राहतील. ज्यांनी पॅन आणि आधार लिंक केलेले नाही ते विलंब शुल्क भरल्यानंतर पॅन-आधार लिंक करू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीने आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पॅन कार्डधारक जे पॅन-आधार लिंक करत नाहीत ते म्युच्युअल फंड, स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत. तसेच, त्यांना बँक खाती उघडता येणार नाहीत आणि ज्या ठिकाणी पॅनकार्ड आवश्यक आहे अशा सर्व कामांमध्ये त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. याव्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीने अवैध पॅन कार्ड तयार केले तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत, मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंड ठोठावू शकतो.
असे लिंक करा
1. सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या वेबसाईटवर जा.
2. पोर्टलवर नोंदणी करा. पॅन क्रमांक हा तुमचा वापरकर्ता आयडी असेल.
3. तुमचा यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून पोर्टलवर लॉग इन करा.
4. आधार कार्डसोबत पॅन लिंक करण्यासाठी एक पॉप-अप विंडो उघडेल.
5. जर तुम्हाला ही पॉप-अप विंडो दिसत नसेल, तर मेन्यू बारमधील प्रोफाइल सेटिंगमध्ये जा आणि आधार लिंकवर क्लिक करा.
6. यानंतर पॅन तपशीलांची पडताळणी करा. तुमचा तपशील जुळत असल्यास तुमचा आधार क्रमांक टाका आणि लिंक नाऊ बटणावर क्लिक करा.
7. आता तुमचा PAN आधारशी यशस्वीपणे जोडला गेला असल्याची माहिती देणारा संदेश पॉप अप होईल.
Pan card Aadhar Card Linking Fine Penalty