त्र्यंबकेश्वर – प्रतीवर्षी निवृत्तिनाथांची पालखी वट पौर्णीमेस अथवा जेष्ठ वद्य प्रतिपदेस पंढरपुरकडे हजारो वारकरी भाविकां समवेत प्रस्थान करते. मजल दरमजल करीत महिन्याभरात ही पालखी पंढरपुरला पोहचते. असा हा भक्तीपुर्ण सोहळा साजरा होत असतो. परंतु मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या महामारीने सगळ्यांवरच बंधने आली आहेत. शासनाने पायी पालखी वारीस बंदी घातली असल्या कारणे २४ जून रोजी अर्थात वटपौर्णिमेला पालखी प्रस्थान सोहळा मंदिरात मोजक्या भाविकंच्या उपस्थितीत संपन्न होणार अाहे तर आषाढी एकादशीचे एक दिवस आधी दोन शिवशाही बसद्वारे पालखी पंढरपुरला जाईल अशी माहिती प्रशासकीय समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यानिमित्त श्रीसंत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानच्या कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली. श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त के.एम.सोनवणे, अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांचेसह नाथांच्या संजिवन समाधीचे पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अॅड. गंभीरे यांनी सांगितले की, दिंडी चालक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्थान सोहळयाची तयारी पूर्ण झाली असुन पालखी सोबत चालणाऱ्या ४० दिंडयांचा प्रत्येकी एक प्रातिनिधिक प्रतिनिधी प्रस्थान सोहळयास उपस्थित राहणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार कोविड – १९ चे नियम पाळून होणाऱ्या या प्रस्थान सोहळयात पारंपारिक पध्दतीने पूजा-अर्चा होणार आहेत. धर्मादाय सह आयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते नाथांच्या समाधीची आरती होईल. सकाळी ८.४५ ते ९ आरती, ९ ते ९.३० नारळ प्रसाद कार्यक्रम, ९.३० ते १०.३० भजन, १०.३० ते ११ पालखी प्रस्थान, ११ ते ११.१५ पर्यंत आरती, ११.३० ते १२ पर्यंत नियोजन बैठक संपन्न होईल व १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल.
कोविड – १९ चे नियमाधिन राहून दिंडीकऱ्यांना या सोहळयात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. पालखी सोहळयाचे मानकरी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प. बाळासाहेब देहुकर, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर आदिंच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्र होणार आहे.