पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसई तालुक्यातील कामण येथील अण्णासाहेब धामणे अनुदानित माध्यमिक आश्रम शाळेत आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला अधिक्षक तथा शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे त्याच्या बरगडीला जबर दुखापत झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आदिवासी विकास विभाग डहाणू प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेत ही घटना घडली. नितीन धनजी मागी (वय १४) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकृती खालावली
कामण येथील आश्रम शाळेत आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या नितीन मागी या विद्यार्थ्याला गोंधळ तथा दंगा मस्ती करतो म्हणून शाळेतील अधीक्षक पृथ्वी बोरसे यांनी रात्रीच्या सुमारास मारहाण केली. त्यानंतर दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करून त्याला रामपूर (डहाणू ) येथे घरी सोडण्यात आले, मात्र सात दिवसांपासून विद्यार्थी हा घरीच असून कोणत्याही प्रकारे त्याच्यावर उपचार सुरू नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघात यांना समजल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.
बरगडीच्या हाडाला इजा
चंद्रकांत वाघात यांना माहिती मुलाची आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डहाणू प्रकल्प अधिकारी यांनी शाळेतील जे दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांला कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तपासणीनंतर विद्यार्थ्यांच्या बरगडीच्या हाडाला इजा झाल्याने पुढील उपचारासाठी वेदांत मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे. आदिवासी प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी, नरेंद्र संखे यांनी सांगितले की, विद्यार्थी व त्याच्या पालकांची भेट घेतली जाणार आहे. सर्व प्रकरण समजून घेतल्यानंतर संबंधित मारहाण करणाऱ्या अधीक्षक व शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील डॉ. संदीप वाघमारे म्हणाले की, कासा उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्याला उपचारांसाठी आणले होते. त्याला तपासून एक्सरे काढला असता त्याच्या बरगड्यांना मार लागला असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले.
Palghar Vasai Ashramshala Student Beaten Crime