पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना सातत्याने घडताहेत. सरकार, प्रशासन अंधश्रद्धेचा नायनाट करण्यासाठी कटीबद्ध असले तरी समाजमन अद्याप बदलण्यास तयार नाही. अशा एका घटनेचा अनुभव पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आला. येथील रुग्णालयात चक्क एका मांत्रिकाने आपल्या कथित तांत्रिक विद्येद्वारे उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोमा लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील या प्रकाराने राज्यात वाढलेल्या अंधश्रद्धेच्या घटनांवर प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच असा प्रकार वारंवार घडू नये यासाठी ग्रामीण भागात अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
रुग्णालय व्यवस्थापन तक्रार देणार का?
थेट रुग्णालयातच अशा पद्धतीने अंधश्रद्धेतून अघोरी विद्येचा प्रयोग झाल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान रुग्णालय व्यवस्थापनाच्या कानी हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितास विरोध केला. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन पोलिसांत तक्रार देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Palghar District Rural PHC Mantrik Treatment Viral Video
talasari health