गाझा सिटी – इस्रायलच्या लढावू विमानांनी सोमवारी (१७ मे) गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर पुन्हा बॉम्ब वर्षाव केला. यात दहशतवाद्यांचे आश्रयस्थाने असलेल्या बोगद्यांवरही हवाई हल्ले करण्यात आले. हमासचा १५ किलोमीटर लांबीचा बोगदा उद्ध्वस्त करण्यात आला असून, हमासच्या वरिष्ठ कमांडरला कंठस्नान घातल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराकडून देण्यात आली.
गाझा पट्टीत सत्ता असलेल्या हमास आणि इस्रायलदरम्यान गेल्या दहा मेपासून रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. या परिसरात सोमवारी इस्रायलकडून करण्यात आलेला हवाई हल्ला सर्वात भीषण असल्याचे बोलले जात आहे. एका दिवसापूर्वी गाझा सिटीत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये तीन इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. नव्या हवाई हल्ल्यात किती जीवितहानी झाली, याबाबत अद्याप कळू शकले नाही.
नऊ घरे निशाण्यावर
उत्तर गाझाच्या विविध भागात हमासच्या वरिष्ठ कमांडरांच्या नऊ घरांवर इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामध्ये कमांडर हुसाम अबू हरबीदला ठार करण्यात आले. इस्रायली नागरिकांवर अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी हरबीद जबाबदार होता.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा सिटीमध्ये एक तीन मजल्याची इमारत उद्ध्वस्त झाली. परंतु हल्ल्यापूर्वीच ही इमारत रिकामी करण्यात आल्याचे इमारतीत राहणार्या लोकांचे म्हणणे आहे. हवाई हल्ल्यांमुळे रस्ते आणि इमारतींचे खूप नुकसान झाले आहे. असाच संघर्ष सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता गाझाचे महापौर याहया सराज यांनी अल जझिरा वृत्तवाहिनीला सांगितले.
हजारोंच्या संख्येने डागले क्षेपणास्त्रे
इस्रायल आणि हमासदरम्यान संघर्ष सुरू झाल्यानंतर आतापर्यंत हजारोंच्या संख्येने एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हमासच्या ठिकाणांवर शेकडो वेळा हवाई हल्ला करण्यात आल्याचे इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आले. गाझाकडून इस्रायलवर ३,१०० क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
२०१ जण ठार
गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत हल्ल्यात ५८ मुले आणि ३५ महिलांसह २०१ पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. इस्रायलमध्ये पाच वर्षीय मुलगा, एका सैनिकासह आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, इस्रायल आणि गाझादरम्यान संघर्ष थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिकेपासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद आणि मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हिंसाचार रोखण्यासाठी बैठक घेतली आहे.