मुंबई – हिरव्या पालेभाज्या खाणे तसेही प्रकृतीसाठी चांगलेच मानले जाते. ह्रदयाचे, डोळ्यांचे आजार असलेल्यांनी तर आवर्जून हिरव्या पालेभाज्या खायला हव्या, असे डॉक्टर सांगतात. पालक खाण्याचेही अनेक फायदे आहेत. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे लाल रक्त पेश्यांचे प्रमाण वाढते आणि शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत आक्सीजन पोहोचविण्याचे कामही पालक करते. पालक मुबलक प्रमाणात खाल्ल्याने शरीरातून रक्ताची कमतरता भरून निघते. ज्या लोकांना एनिमियाचा त्रास आहे, त्यांनी तर आपल्या जेवणात पालक अवश्य सामील करायला हवा. पालकात कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांवर त्याचा मुळीच वाईट परिणाम होत नाही. पालकात असेही काही तत्व असतात, जे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात, ज्यामुळे शुगर लेव्हल वाढत नाही.
गर्भवतींमध्ये सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आयरनची उणीव असते. त्यामुळे त्यांना नियमीत स्वरुपात पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. गर्भात भ्रुण विकसित होत असतावा त्याच्या निर्मितीसाठी रक्ताची गरज असते. अश्यात शरीरात लाल रक्त पेश्यांच्या निर्मितीमध्ये पालक महत्त्वाची भूमिका बजावतो. पालकात फ्लेवोनॉईड अँटीआक्सीडेंट असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते. याशिवाय ह्रदयाशी संबंधित आजारांशी लढण्याकरिताही पालक मदत करतो. यात असलेले बिटा कॅरोटीन आणि व्हिटामीन सी कुठल्याही आजारापासून रक्षण करतात. पालकात मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. ते पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करते. एखाद्याला अपचनाची तक्रार असेल तर त्याने पालक उकळून घेत त्यात शंभर मिली पाणी टाकून प्यायले तर समस्या दूर होते. पालकात आयर्न आणि व्हिटामीन सी असल्यामुळे केस गळण्याची समस्याही दूर होऊ शकते. एनिमीयाने त्रस्त लोकांना केस गळण्याची समस्या जास्त असते. त्यामुळे त्यांनी पालक मुबलक प्रमाणात खायला हवा.