लाहोर – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची मैत्रीण असलेली 67 वर्षीय पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांचे पाकची गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असल्याच्या आरोपांचे खंडण केले आहे. हा आरोप अत्यंत संतापजनक आणि निराशाजनक असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच या आरोपांमुळे भारतीय एजन्सींच्या तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचेही अरुसा यांनी सांगितले. तसेच या आरोपा मागे नवज्योत सिंग सिद्धू याचा डाव असल्याचेही तिने म्हटले आहे.
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी सांगितले होते की, आरुषाचा आयएसआयशी काही संबंध आहे की नाही याची चौकशी केली जाईल. रंधावा यांनी दावा केला की, अमरिंदर सिंग आणि अरुसा हे दोघे वर्षानुवर्षे मित्र आहे आणि ती वर्षानुवर्षे भारतात राहत होती आणि वेळोवेळी तिचा व्हिसा वाढवला आहे. तर दुसरीकडे भारताच्या केंद्रीय यंत्रणांना या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास मी सहकार्य करण्यास तयार आहे, असेही अरुसा म्हणाली. माझ्याविरुद्धच्या निराधार आरोपांचा तपास करण्यासाठी भारत आणखी तिसऱ्या देशाच्या तपासकर्त्यांचीही मदत घेऊ शकतो. भारताच्या केंद्रीय यंत्रणांना या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर मी सहकार्य करण्यास तयार आहे, असे देखील अरुसा हिने सांगितले.
अरुसा म्हणाली की, 16 वर्षांपूर्वी, जेव्हा मला काही कारणास्तव भारतीय व्हिसा नाकारण्यात आला तेव्हा भारत सरकारने अशी चौकशी केली आणि नंतर व्हिसा देण्यात आला, नोव्हेंबरमध्ये ती शेवटची भारतात आली होती. मात्र पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची तिच्याशी अजूनही चांगली मैत्री आहे. या वादानंतरही कॅप्टन साहेब अजूनही माझे चांगले मित्र आहेत, असे तिने स्पष्ट केले.
आलम हिने आरोप केला की, “माझे संबंध आयएसआयशी जोडण्याची कल्पना नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मुख्य रणनीतीकार मोहम्मद मुस्तफा यांची होती. सिद्धू मुख्यमंत्री होण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी काही जणांना आयएसआयबद्दल बोलण्याचा सल्ला दिला असावा. कारण आयएसआयची चर्चा भारतात काही नागरिकांना खूप आवडते. जर माझी तपासणी करायची असेल तर त्याचे स्वागत आहे.