नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सणासुदीच्या काळात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक करून त्याचा कट उधळला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मोहम्मद अशरफ असे दहशतवाद्याचे नाव आहे. दिल्लीमध्ये तो अली अहमद नुरी या नावाने वास्तव्यास होता. गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये राहात होता. यादरम्यान त्याने गाझियाबादच्या वैशाली, गौड सिटीसह अनेक ठिकाणे बदलली आहेत. त्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
आयएसआयच्या सूचनांवरून कामे
पोलिसांनी त्याच्याकडून अत्याधुनिक एके-४७ रायफल, दोन मॅगझिन ६० राउंड, एक हँड ग्रेनेड, दोन पिस्तुल आणि ५० राउंड काडतुसे, बनावट ओळखपत्र त्याच आधारावरून बनविलेला भारतीय पासपोर्ट जप्त केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरसह इतर राज्यात झालेल्या दहशवादी संघटनांमध्ये त्याचा सहभाग होता. आयएसआय कमांडर नासीर याच्या इशार्यावरून मोहम्मह अशरफ काम करत होता. नासीर यानेच त्याला भारतात पोहोचवले होते. पटयाला न्यायालयासमोर त्याला मंगळवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी मिळाले इनपूट
विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद सिंह कुशवाह म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला होणार असल्याचे इनपूट मिळाले होते. त्यावरून पोलिस आयुक्तांनी सर्व जिल्हा पोलिसांसह, विशेष पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले होते. टेक्निकल सर्व्हिलांसच्या आधारावरून पोलिस संशयितावर लक्ष ठेवून होते. सोमवारी रात्री गुप्त सूचनेवरून रमेश नगरमधून अटक करण्यात आली.
बांगलादेशातून सिलीगुडी मार्गे भारतात
दहशतवाद्याने बांगलादेशातून सिलीगुडी मार्गे भारतात प्रवेश केला होता. तो सणासुदीच्या दिवसांत मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होता. आरोपीने अली अहमद नुरी नावाने शास्त्री नगरचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते. आरोपीच्या खुणेवरून तुर्कमान गेट परिसरातून भारतीय पासपोर्ट बनवून घेतले होते. पोलिस त्याची मदत करणार्यांची यादी तयार करून छापेमारी करत आहे.
कट रचण्याच्या तयारीत
आयएसआय कमांडर नासीर याच्या सूचनेवरून तो भारतात बस्तोर स्लीपर सेलचा प्रमुख म्हणून काम करत होता. बांगलादेशच्या मार्गे तो भारतात २०१४ रोजी आला होता. त्याला हवालाच्या माध्यमातून पैसे मिळत होते. भारतात बनावट कागदपत्रे बनवून तो अनेक ठिकाणी राहिला. दिल्लीच्या आसपास त्याने पीर मौलानाचे काम करत होता. दहशतवादी अशरफने गाझियाबादमधील वैशाली येथील एका मुलीसोबत लग्नही केले होते. परंतु ठिकाण बदलल्यानंतर त्याने मुलीला तिथेच सोडून दिले. दिल्ली-एनसीआर, जम्मू, अजमेर आणि उधमनगरमध्येही तो राहिला आहे. अजमेरमध्ये एका मशिदीत तो राहिला होता.