मुंबई – दहशतवादाच्या जोरावर जगात शेखी मिरविणारा पाकिस्तान मात्र स्वतःच्या देशात पाण्यासाठी मोहताज झाला आहे. या देशाची मुख्य समस्या दहशतवाद असल्याचे वरवर दिसत असले तरीही त्याहीपेक्षा गंभीर अशी पाण्याची समस्या त्यांना भेडसावत आहे. एरवी दहशतवादावरून एकमेकांच्या शेपट्या ओढणारे पाकिस्तानातील राजकारणी आता पाण्यावरून भिडले आहेत.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) च्या अलीकडच्याच अहवालात पाकिस्तानात पसरत चाललेल्या जल संकटावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषच्या एका अहवालातही पाकिस्तानातील पाण्याचा प्रश्न उजागर करण्यात आला होता. मुद्रा कोषच्या अहवालानुसार पाकिस्तानात २०४० पर्यंत पाण्याचा स्तर खाली जाईल. पाकिस्तानात पिण्या योग्य स्वच्छ पाणीही नसेल.
सध्या जगात पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९६१ आणि १९९१ च्या तुलनेत पाकिस्तानात प्रती व्यक्ती पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता खूप कमी झाली आहे. या अहवालात २०२५ पर्यंत पाकिस्तानात पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार, असा इशारा देण्यात आला आहे. ‘बुंद बुंद के लिए तरसना’ याची साक्षात प्रचिती पाकिस्तानला येईल, असे हा अहवाल म्हणतो.
लोकसंख्या वाढतेच आहे
पाण्याचे संकट निर्माण होण्याला वाढती लोकसंख्या कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. परिणामी शेतीलाही पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानात धान्याचेही संकट येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.