लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच झालेल्या T20 सामन्यात पाकिस्तानच्या भारतावर विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा लागू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत हँडलवरील ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांना देशद्रोहच म्हणावे लागेल.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यानंतर काही समाजकंटकांनी भारतीय संघाविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरून देशविरोधी वक्तव्य करून शांतता भंग केली. आग्रा, बरेली, बदायूं आणि सीतापूरमध्ये पाच प्रकरणे नोंदवून आतापर्यंत सात जणांना या संदर्भात ओळखण्यात आले आहे. त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणांचा तपास सुरू असून पुराव्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करून त्याच्या फेसबुक पेजवर पाकिस्तानचा झेंडा लावल्याबद्दल बदाऊन येथील एका तरुणाला पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. फैजगंज बेहता येथील रहिवासी असलेल्या नियाजने त्याच्या फेसबुक पेजवर पाकिस्तानचा ध्वज पोस्ट केला आणि पाकिस्तानच्या बाजूने काही नारे लिहिले. पोलिस ठाण्यात त्याच्या विरूद्ध देशद्रोह आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्याच्या घटनेने लोकांमध्ये नाराजी पसरली असून हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ते पुनीत शाक्य यांनी नियाजविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.