इस्लामाबाद – दहशतवादाचा बालेकिल्ला असलेला पाकिस्तान दारिद्र्याच्या स्थितीत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज नाकारले आहे. तसेच एक अब्ज डॉलर्सचा पुढचा हप्ता देखील थांबवला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास पाक सरकारकडे पैसे नाहीत. यावरून इम्रान खान सरकारच्या वाईट स्थितीचा अंदाज येऊ शकतो.
पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारकडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसेही नाहीत. आधीच गरीब स्थितीत पोहचलेल्या पाकिस्तानमधील परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. कारण अधिक कर्ज देण्यास नकार देत आयएमएफने पाकिस्तानला दिलेला 1 अब्ज डॉलर्सचा हप्ताही थांबवला आहे. इम्रान सरकार 6 अब्ज डॉलर्सच्या विस्तारित फंड सुविधा (ईएफएफ) अंतर्गत आयएमएफसोबत करारावर बोलणी करत होते, मात्र ती पूर्ण झाली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकारची आर्थिक स्थिती आणखी बिकट होणार आहे.
पाकिस्तान आणि IMF ने जुलै 2019 मध्ये 6 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी करार केला होता. या करारानुसार, आयएमएफ पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या रूपात एक अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता देणार होता. या कर्ज करारासंदर्भात दोन्ही बाजूंनी चर्चा झाली, पण पाकिस्तान आयएमएफ अधिकाऱ्यांना समाधान देऊ शकला नाही. कारण पाकिस्तान आयएमएफसोबत आर्थिक आणि अन्य धोरणांच्या मसुद्यावर सहमत होण्यात अपयशी ठरला आहे.