नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना नेहमीच आश्रय दिला जातो, इतकेच नव्हे तर येथील सरकार देखील दहशतवादी संघटनांच्या कारवायांना वारंवार पाठिंबा देते असते, हे आता जग जाहीर झाले आहे, इतकेच नव्हे तर सध्याच्या काळात देखील १२ खतरनाक दहशतवादी संघटनांना पाकचा पाठिंबा असल्याचे एका अमेरिकन अहवालातून उघड झाले आहे.
दहशतवादाबाबत अमेरिकेच्या स्वतंत्र काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात पाकिस्तानबाबत आरोप करण्यात आले आहेत. या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये १२ भयानक दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासह ५ दहशतवादी संघटनांचे लक्ष्य भारत आहे. पाकिस्तानला अनेक सशस्त्र आणि अराजक दहशतवादी संघटनांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखले आहे. यातील काही दहशतवादी संघटना १९८० पासून अस्तित्वात आहेत.
गेल्या आठवड्यात क्वाड शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय संशोधन शाखेने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या या गटांना मोठ्या प्रमाणात पाच श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. यामध्ये जागतिक स्तरावरील दहशतवादी संघटना, अफगाण-केंद्रित, भारत आणि काश्मीर-केंद्रित, देशांतर्गत मर्यादित असलेल्या संघटना आणि धर्मविचार-केंद्रित (शिया विरुद्ध सुन्नी ) दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. यातील काही संघटनांची थोडक्यात माहिती अशी…
लष्कर-ए-तैयबा
लष्कर-ए-तैयबाची स्थापना १९८० मध्ये पाकिस्तानमध्ये झाली असून २००१ मध्ये तिला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. ही संघटना भारतातील मुंबईतील २००८ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी तसेच इतर अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.
जैश-ए-मोहम्मद
जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ची स्थापना २००० मध्ये काश्मिरी दहशतवादी नेता मसूद अझहरने केली होती. आणि २००१ मध्ये तिला परदेशी संघटना म्हणूनही घोषित करण्यात आले होते. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यासह इतर अनेक हल्ल्यांसाठी देखील तिला जबाबदार धरण्यात येत आहे.
हरकत-उल जिहाद इस्लामिक
हरकत-उल जिहाद इस्लामीची स्थापना १९८०मध्ये अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी करण्यात आली होती. आणि १० वर्षानंतर तिने भारतावर लक्ष केंद्रित केले, तसेच अफगाणमध्ये तालिबानकडे आपले लढाऊ पाठवले. ही संघटना आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतामध्ये कारवाया करत असून आम्ही काश्मीरला पाकिस्तानमध्ये जोडणार असे या संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.
हिजबुल मुजाहिदीन
हिज्बुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना १९८९ मध्ये स्थापन झाली होती, ही पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या इस्लामवादी पक्षाची दहशतवादी शाखा आहे आणि २०१७ मध्ये तिचा परदेशी संघटनेच्या यादीत समावेश केला होता. जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेली ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी दहशतवादी संघटना आहे.
अल कायदा
इतर दहशतवादी संघटना जे पाकिस्तानमधून आपले उपक्रम राबवतात त्यात अल कायदा समाविष्ट आहे, ती प्रामुख्याने संघीय प्रशासित आदिवासी क्षेत्र, कराची व अफगाणिस्तान येथून कार्यरत आहे. अयमान अल-जवाहिरीने २०११ पर्यंत त्याचे नेतृत्व केले आणि देशातील इतर अनेक दहशतवादी संघटनांशी त्याचे सहकारी संबंध असल्याचे कळते.
अन्य संघटना सक्रिय
पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवादी संघटनांमध्ये अल कायदा इन इंडिया सबकॉन्टिनेंट , इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत, अफगाणिस्तान टेलन, हक्कानी नेटवर्क, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान , बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जुंदाल्ला उर्फ जैश अल-अदल, सिपाह-ए-सहबा पाकिस्तान आणि लष्कर-ए-झांगवी यांचा समावेश आहे.