इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील कब्रस्तानांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी दफन केलेल्या मृतांच्या कबर तोडून त्यामध्ये दुसरे मृतदेह दफन केले जात आहेत. १.६ कोटी लोकसंख्या असलेल्या या किनारी शहरात जुने मकबरे तुटलेले दिसून येत आहेत. कब्रस्तानमध्ये जागेचे संकट उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कबरमाफियांनी संधीसाधूपणा सुरू केला आहे.
कब्रस्तानमध्ये जागेचे संकट इतके गंभीर झाले आहे, की नातेवाईकांचे मृतदेह दफन करण्यासाठी कबरमाफियांना मोठी रक्कम द्यावी लागत आहे. कराचीमध्ये २५० कब्रस्तान आहेत. परंतु कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
“वास्तविकरिच्या पायाभूत सुविधा पुरेशी उपलब्ध नाही, ही खरी समस्या आहे. शहरातील पायाभूत सुविधा पाकिस्तानच्या स्थापनेपासून ज्या होत्या त्याच आहेत. काही कमी झाले किंवा वाढलेही नाही. मात्र शहरातील लोकसंख्या दररोज वाढत आहे. जागेचे संकट निर्माण झाल्याचा परिणाम हा झाला की, कबरी खोदणाऱ्या माफियांचा व्यवसाय वाढला आहे,” अशी माहिती ३९ कब्रस्तानांचे व्यवस्थापन करणाऱ्या कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे प्रवक्ते अली हसन साजिद यांनी दिली.
कबरमाफिया खली अहमद सांगतात, की “कराचीमधील कोणत्याही कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे जुन्या कबरी तोडल्या जात आहेत. कराचीमध्ये सरकारी दफन शुल्क ७,९०० रुपये आहे. परंतु दोन स्थानिक नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह दफन करण्यासाठी ५५ हजार आणि १ लाख ७५ हजार रुपये मोजले होते. येथे काम करणाऱ्या ४० मजुरांमध्ये हे शुल्क वाटले जाते.”
https://twitter.com/AFP/status/1514818310155943938?s=20&t=BxS4Tfr252NE3xzU49F3Ig
पाकिस्तानमध्ये दूधमाफिया, साखरमाफिया आणि भूमाफिया यांच्याप्रमाणेच कबरमाफियांकडेसुद्धा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे किंवा संधीसाधू भ्रष्टाचारी असल्याच्या नजरेने पाहिले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या विषम परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो. कराचीमधील लोकसंख्या वाढण्यासह कबरमाफियांचा व्यवसायही चांगलाच बहरला आहे. कराचीप्रमाणेच रावळपिंडी, पेशावर आणि लाहोरमध्येही हा व्यवसाय पसरत चालला आहे.
कबरमाफिया सक्रिय झाल्यामुळे नातेवाईकांची अखेरची आठवण वाचवणे नागरिकांसाठी कठीण होत चालले आहे. काही नागरिक नियमितरित्या आपल्या पूर्वजांच्या कबरींची देखभाल करताना दिसत आहेत. तर, जे नागरिक अनेक वर्षांनंतर पूर्वजांची अखेरची आठवण पाहण्यासाठी जातात, त्यांना त्या कबरीवर दुसऱ्यांच्या पूर्वजांच्या नावाचा दगड पाहायला मिळतो. शहरातील कोरंगी कब्रिस्तानमध्ये वडिलांच्या कबरीवर इबादत करण्यासाठी पोहोचलेल्या मुहम्मद मुनीर यांना वडिलांची अखेरची आठवण गायब असल्याचे आढळले.