मनिष कुलकर्णी, नवी दिल्ली
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीचा वाद आता नाट्यमय वळणावर येऊन पोहोचला आहे. हे प्रकरण असे पुढे सुरू राहिले तर पाकिस्तानात मोठे घटनात्मक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादाच्या झळा लोकशाही नियुक्त सरकारपर्यंत पोहोचू शकतात. पाकिस्तानी लष्कर घटनात्मक तरतुदींवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान इम्रान खान आयएसआय प्रमुखांच्या नियुक्ती प्रकरणात कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करत आहेत. या कायदेशीर तरतुदी काय आहेत? या राजकीय संघर्षाची परिणिती काय असेल? पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार असुरक्षित आहे का? पंतप्रधानपदावरून इम्रान खान हटविले जाऊ शकतात का? या प्रकरणात काय होऊ शकते याबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.
पाकिस्तानात जेव्हा कधी सरकार आणि लष्करात संघर्ष निर्माण झाला आहे, तेव्हा लष्कराने सरकारवर ताबा मिळविला आहे. त्यामुळे हा वाद जास्त ताणला गेला तर इम्रान खान यांच्या लोकनियुक्त सरकारला धोका पोहचू शकतो. मला सध्या चांगले संकेत दिसत नाहीयेत. इम्रान खान सरकारच्या लोकप्रियतेचा आलेख खाली येत असल्याचे पाकिस्तान लष्कराचे निरीक्षण आहे. २०१८ मध्ये सत्तेत आल्यानंतर इम्रान खान प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर या संधीचा गैरफायदा घेऊ शकते.
सर्व क्षेत्रात इम्रान अपयशी
पंतप्रधान इम्रान खान देशांतर्गत आणि बाहेरील समस्या सोडविण्यास अपयशी ठरले आहेत. कोरोना महामारीविरुद्ध लढा देतानाही सरकार निष्फळ ठरले आहे. तसेच अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख खाली घसरत आहे. मुत्सद्देगिरीतही ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पुलमावा दहशतवादी हल्ला, काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यासारख्या मुद्द्यांवरून भारताने पाकिस्तानला मुत्सद्देगिरीत मात दिली आहे. इम्रान खानच्या कार्यकालात अमेरिकेसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बेरोजगारी आणि महागाईसुद्धा वाढलेली आहे. लष्करासाठी ही परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे लष्कर सरकारवर ताबा मिळवू शकते.
कुरेशी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?
शाह मेहमूद कुरेशी देशाचे नवे पंतप्रधान बनू शकतात ही शक्यता पाकिस्तानी माध्यमांमध्ये जोर धरू लागली आहे. लष्कर आणि विरोधी पक्षांमध्ये कुरेशी यांची प्रतिमा चांगली असून, ते चांगलेच लोकप्रिय आहेत. कुरेशी यांना नेहमीच पंतप्रधान बनण्याची इच्छा होती याबाबत पाकिस्तानात चर्चा आहे. यापूर्वी झालेल्या दोन प्रयत्नांत ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. एकदा युसूफ रझा गिलानी तर दुसर्यांदा इम्रान खान त्यांच्या रस्त्यात अडथळा ठरले होते. विशेष म्हणजे कुरेशी आणि लष्कर यांच्यात चांगले संबंध आहेत. तर इम्रान खान यांना पूर्ण विरोधी पक्ष इलेक्टेडच्या ऐवजी सिलेक्टेड पंतप्रधान म्हणून संबोधतात.
पाकिस्तानच्या राजकारणात पर्याय कोणता?
हा वाद आणखी वाढला तर लष्कराजवळ दोन पर्याय असू शकतात. पहिला, लष्कर इम्रान खान सरकारला बडतर्फ करून सत्ता काबीज करू शकते. दुसरा, इम्रान खान यांना हटवून कोणत्यातरी विशेष व्यक्तीला पंतप्रधानपदावर बसवू शकते. वाद आणखी चिघळला तर इम्रान खानला हटविले जाऊ शकते. परंतु सध्या या निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरू शकते. पाकिस्तानात ही संस्कृती नाही, असेही म्हटले जाऊ शकत नाही. तिथे काहीही होऊ शकत नाही.
भारतावर काय परिणाम?
पाकिस्तानात लष्कराचे सरकार येणे हे भारतासाठी शुभ संकेत नाहीत. कारगिल युद्धाला जबाबदार जनरल परवेझ मुशर्रफ यांनी लोकनियुक्त सरकारला उलथवून सरकारला ताबा मिळविला होता. लष्कराची सत्ता आल्यावर काश्मीर खोर्यात दहशतवादी कारवायांमध्ये नेहमीच वाढ झाली आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानमधील संबंध तणापूर्णच राहिले आहेत. भारताचे लोकनियुक्त सरकार पाकिस्तानी लष्करी सत्तेसोबत संबंध सुरळीत करण्याबाबत संकोच करते.