इस्लामाबाद – सुमारे सत्तर वर्षाचा इतिहास पाहता पाकिस्तानमध्ये नेहमीच अस्थीर राज्यकारभार दिसून येतो, येथे वरवर लोकशाही वाटत असली तरी येथे नेहमीच हुकूमशाही सुरू असल्याचे दिसते. सत्ताधारी पक्ष किंवा नेत्याला विरोधकांने प्रचंड भय वाटते. आतादेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सैन्य आणि विरोधी पक्षाकडून सरकारला धोका निर्माण होऊ लागला असून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपले सरकार पाडण्यासाठी सैन्यदलाची मदत घेतली, असा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
पाकीस्तानमधील महामार्ग विकास आणि पुनर्वसन प्रकल्पाच्या शिलान्यास सोहळ्यात इम्रान खान यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की, विरोधी पक्षांचे नेते स्वत: ला लोकशाहीवादी म्हणून संबोधतात पण ते निवडलेल्या सरकारला पाडण्याची नेहमी चर्चा करतात. तसेच विरोधकांनी लष्कराला उघडपणे आपले सरकार उलथून टाकण्यास सांगितले होते.
ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्यावरील बंदीची बाब देशात चर्चेत आली आहे. आयएसआय आणि सैन्यदलावर टीका केली म्हणून मीरला वृत्तवाहिनीवर लोकप्रिय टॉक शो सादर करण्यास बंदी घातली गेली. याबाबत पंतप्रधान इम्रान यांच्यावर आरोप केला जात आहे.
पत्रकार हमीद मीरला हा कार्यक्रम सादर होण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानचे इम्रान खान सरकार आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांनी दबाव आणला, अशी यांच्यावर टीका केली जात आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्ष, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, मानवाधिकार संघटना, फेडरल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांनी मीरवरील बंदीला विरोध दर्शविला आहे. मात्र, मीर यांच्यावर दबाव कोण आणत आहे हे टिव्ही चॅनेल व्यवस्थापनाने उघड केले नाही.