इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले पाकिस्तान मधील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार आता मोठ्या संकटात सापडले आहे. फसलेले परराष्ट्र धोरण त्याचबरोबर अंतर्गत शक्तींकडून वाढता दबाव यामुळे इम्रान खान यांना आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही.
इम्रान खानचा सर्वात मोठा मित्र मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ने त्यांची साथ सोडली आहे. आणि त्यानंतर त्यांचा स्वतःचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ बहुमताच्या 172 च्या खाली गेला आहे. एका वृत्तानुसार 177 खासदारांसह आता संसदेत विरोधकांची संख्या जास्त आहे. आणि विरोधकांना आता असंतुष्ट खासदारांच्या पाठिंब्याची गरज नाही.
दुसरीकडे, इम्रान सरकारला केवळ 164 खासदारांचा पाठिंबा आहे. अपक्ष मोहम्मद अस्लम भुतानी यांनी इम्रान खान सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आसिफ अली झरदारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी, पीएमएल-क्यूचे खासदार आणि फेडरल हाऊसिंग मंत्री तारिक बशीर चीमा यांनी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 342 सदस्य असतात. इम्रान खान यांना सरकारमध्ये राहण्यासाठी 172 जागांची गरज आहे. इम्रान खान यांना सध्या 164 खासदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे 155 सदस्य आहेत.
दरम्यान, इम्रान सरकारला पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद (पीएमएल-क्यू) च्या 4 खासदारांचा, ग्रँड डेमोक्रेटिक अलायन्सचा 3 आणि अवामी मुस्लिम लीग पाकिस्तानचा 1 आणि बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) च्या 1 खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकूण संख्या 164 झाली असली तरी बहुमतापासून 8 जागांनी दूर आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज PML(N) 84 जागांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे 56 सदस्य आहेत. या 140 जागांशिवाय विरोधी पक्षांना आणखी 37 खासदारांचा पाठिंबा आहे. समजा विरोधी पक्षांकडे बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत.
अशा स्थितीत इम्रान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार की, त्याआधीच पडणार हे लवकरच ठरेल. 2018 मध्ये इम्रान खानचा पक्ष सत्तेवर आला आणि पाकिस्तानमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे. परंतु आता त्यापुर्वीच इम्रान खान सरकार कोसळण्याची शक्यता आहे.