इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या परराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शरीफ यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाला सौदी अरबमध्ये नाराजीचा सामना करावा लागला आहे. एका मशिदीत प्रवेश करताना तेथील उपस्थित भाविकांनी प्रतिनिधीमंडळाकडे पाहून चोर-चोर अशी घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी काही नागरिकांना अटक केली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मस्जिद-ए-नवाबी मध्ये जाताना काही नागरिक प्रतिनिधीमंडळाला विरोध करताना दिसत आहे. त्यांना पाहून ते चोर चोर घोषणाबाजी करत आहेत. व्हिडिओमध्ये माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य शाहजैन बुगती दिसत आहेत.
पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या हवाल्याने एएनआयने सांगितले, की औरंगजेब यांनी या घटनेला माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार ठरवत त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की मी या पावनभूमीत त्या व्यक्तीचे नाव घेऊ इच्छित नाही. कारण मी राजकारणासाठी या जमिनीचा वापर करणार नाही. त्यांनी (पाकिस्तान) समाजाला पूर्णपणे संपवून टाकले आहे. या वेळी पंतप्रधान शरीफ यांच्यासोबत अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यात शरीफ सौदी अरबकडून ३.२ बिलियन डॉलरचे अतिरिक्त पॅकेज मागणार आहेत. सौदी अरबने यापूर्वीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या पाकिस्तानला ३ बिलियन डॉलर डिपॉझिट दिले आहेत. एका अंदाजानुसार, पाकिस्तानला कर्ज चुकवण्याच्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा कमी होण्यापासून वाचवण्यासाठी बिलियन डॉलरची गरज आहे.
या घटनेनंतर पाकिस्तानमधील माजी उपसभापती कासीम सुरी यांच्यावर इस्लामाबाद येथे हल्ला झाला. जम्हुरी वतन पार्टीच्या शाहजैन बुगती यांच्या समर्थकांनी सुरी यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या घटनेदरम्यान सुरी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते.