इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान इमरान खान सध्या मोठ्या विवादाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. देशावर कर्जाचा डोंगर उभा असताना त्यांचे विरोधक एकामागून एक आरोप करत असल्याने इम्रान खान खूप हैराण झाले आहेत. त्यामुळे यांनी राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याचा सल्ला दिला असून त्यांचे पंतप्रधानपदही धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे निकटवर्ती त्यांच्यापासून दूर जात आहेत, किंबहुना काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
इम्रान खानच्या सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नांमध्ये 32 दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळ्यात अटक होण्याच्या भीतीने त्याच्या पत्नीची जवळची सखी दुबईला पळून गेली आहे. इम्रान खानच्या निकटवर्तीयांना नवीन सरकार स्थापन झाल्यास बदलाची भीती वाटते. इम्रान खानची तिसरी पत्नी बुशरा बीबी हिची जवळची मैत्रीण असलेल्या फराह खानवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर देश सोडून पळून गेल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, तिचा पती अहसान जमील गुजर आधीच अमेरिकेला गेला आहे. त्यानंतर आता ती दुबईला रवाना झाल्याचे वृत्त कळाले आहे. अधिकार्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पद मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सुमारे सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांचा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला आहे की, फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे. मरियमच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांची “चोरी” पकडली जाईल, अशी भीती वाटते.
नुकतेच पाकमधील पंजाब प्रांताचे राज्यपाल चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनी फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला होता.
त्याच वेळी इम्रान खानचे आणखी जवळचे सहकारी देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने इम्रान खान यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर, इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद विसर्जित केली आहे .