इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तान या देशाची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची असून इम्रान सरकार कर्जबाजारी झाल्याने जगातील अनेक देशांत कडे त्यांची मदतीची याचना सुरू आहे. त्यातच आता पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. परंतु इम्रान खान पूर्णपणे रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसरीकडे युक्रेनवरील हल्ल्या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीमुळे अमेरिका नाराज झाली आहे. सदर नाराजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांच्या विधानातूनही दिसून आली, त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनवर रशियाचे हल्ले आणि या संदर्भात अमेरिकेच्या भूमिकेची पाकिस्तानला जाणीव करून देण्यात आली आहे. इम्रान यांची पुतिन यांच्याशी भेट अशा वेळी झाली, जेव्हा अनेक पाश्चात्य देशांनी काही तासांपूर्वी रशियावर निर्बंध घालण्याची घोषणा केली होती.
इम्रानचा एक व्हिडिओ मेसेज शेअर करण्यात आला, त्यामध्ये ते आनंदाने म्हणत आहे की, पुतिनला भेटण्याची हीच योग्य वेळ आहे. मात्र या गोष्टींमुळे पाश्चिमात्य शक्तींना पाकिस्तानचा राग आला. पाकिस्तान सतत चीनशी जवळीक साधत असल्याने देखील अमेरिकाही त्याच्यावर नाराज असल्याचे अहवालात म्हटले आहे. अमेरिका चीनला आपला शत्रू मानते, कारण तो रशियाला शांतपणे पाठिंबा देत आहे. पाकिस्तानी मीडियाही इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्यावर जोरदार टीका करत आहे. दरम्यान, इम्रान यांच्या रशिया दौऱ्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते आश्चर्यचकित झाले असतानाच त्यांच्या राजकीय आणि मुत्सद्देगिरीवर हल्ला करण्याची आणखी एक संधी विरोधी पक्षांना मिळाली आहे. इम्रानच्या रशिया दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे युक्रेनमधील राजदूत नोएल खोखर यांनी वक्तव्य करून देशात वाद झाले होते. युक्रेनच्या प्रथम उप परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या भेटीदरम्यान, खोखर यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले. अनेक विश्लेषकांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीची गरज असल्याचा इशारा दिला होता आणि रशिया स्वतः संकटातून जात आहे. मात्र दोन्ही देशांदरम्यान कोणताही सामंजस्य करार झाला नाही यावरूनही या भेटीचे महत्त्व कळू शकते.