इस्लामाबाद – काश्मीरच्या लोकांना पाकिस्तानात राहायचे की, त्यांना स्वतंत्र राष्ट्र बनण्याची इच्छा आहे, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य पाकिस्तान देईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही भारताची ठाम भूमिका असतानाही घोषित धोरणाला बगल देऊन पाकिस्तानने काश्मीरचे तुणतुणे पुन्हा वाजविले आहे.
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या (गुलाम काश्मीर) तरार खल परिसरात एका प्रचारसभेत इम्रान खान बोलत होते. पाकिस्तान सरकार काश्मीरला पाकिस्तानचा भाग बनविण्याच्या योजनेवर काम करत असल्याचा एका विरोधी पक्ष नेत्याचा दावाही इम्रान खान यांनी फेटाळून लावला आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी गुलाम काश्मीरमध्ये १८ जुलैला प्रचारसभा घेतली होती. काश्मीरची स्थिती बदलून त्याला पाकिस्तानचा प्रांत बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला होता.
पीओकेमध्ये जनतेचा छळ
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील जनतेला तेथील लष्कराच्या अत्याचारासह सरकारी धोरणांचाही फटका बसत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. इम्रान खान सरकारच्या २०२१ च्या अर्थसंकल्पात सर्वात कमी निधी या भागाला देण्यात आला होता. त्यामुळे विरोधी पक्षांसह तेथील जनतेमध्ये असंतोष उफाळला होता. सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. विरोधी पक्षांसह अत्याचाराने पीडित झालेल्या जनतेनेही सरकारविरोधात वज्रमूठ आवळली होती. निधी पुरविण्यात झालेला भेदभाव अस्वीकार्ह आहे, असे गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमजद हुसेन यांनी म्हटले आहे. इम्रान खान सरकारने आपल्या धोरणांचा आढावा घेतला नाही, तर विरोधी पक्ष तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.