इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानात सध्या वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. आतापर्यंत नागरिकांची खिसे रिकामे होत होते, परंतु आता इम्रान खान यांच्या सरकारसमोरच संकट निर्माण झाले आहे. अनियंत्रित महागाईच्या मुद्द्यावरून पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु पाकिस्तानातील लष्कराचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असून, सरकारचा पाकिस्तानी लष्करावरील विश्वास कायम आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यास इम्रान खान सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमएल-एनचे प्रवक्ते मरियम औरंगजेब म्हणाले, की पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपुल्स पार्टी (पीपीपी) च्या जवळपास १०० खासदारांनी या प्रस्तावावर हस्ताक्षर केले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव नॅशनल असेंब्ली सचिवालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नियमांनुसार, सभापतींना असेंब्लीचे एक अधिवेशन बोलावण्यासाठी किमान ६८ खासदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. आता अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी तीन ते सात दिवसांच्या आत अधिवेशन आयोजित करावे लागणार आहे. ३४२ खासदार असलेल्या संसदेत पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला हटविण्यासाठी विरोधी पक्षाला १७२ सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.
इम्रान खान ज्या युतीच्या सरकारचे नेतृत्व करत आहे, त्यातील काही पक्ष महागाईवरून पालटले तर त्यांच्या सरकारवर संकट निर्माण होऊ शकते. देशातील बलवान लष्कर त्यांच्यासोबत असून सरकार कोसळणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांना १८० दशलक्ष रुपये देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले असून, अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिल्यावर त्यांना ही रक्कम मिळणार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. हे पैसे घेऊन गरिबांमध्ये वाटून द्यावे असेही खान यांनी म्हटले आहे.