इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर अविश्वास प्रस्तावामुळे टांगती तलवार कायम असताना आता नव्या घडामोडींमुळे सरकारवरचे संकट आणखी गडद झाले आहे. इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) दोन दिवसीय बैठक समाप्त झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या नेतृत्वाखालील इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांना पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत.
पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्यप्रमुख आणि इंटर सर्व्हिसेस इंटिलिजेंस (आयएसआय)चे प्रमुख नदीम अंजूम यांनी इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर बाजवा आणि तीन इतर वरिष्ठ लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांनी खान यांना सत्तेवरून पायउतार करण्याचा निर्णय घेतला होता.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्व चार लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांना सत्तेवरून पायउतार होण्याशिवाय कोणताच मार्ग न देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पीटीआय सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान इम्रान खान यांनी शुक्रवारी लष्करप्रमुख बाजवा यांची भेट घेतली होती. देशातील राजकीय घटनांवरच या बैठकीत चर्चा झाली. ओआयसी शिखर संमेलन, बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेली अशांतता आणि इम्रान खान सरकारविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
११ मार्च रोजी आपल्या एका भाषणात विरोधी पक्षांवर असभ्य भाषेत अपमानजनक टिप्पणी करण्यास मज्जाव करण्याचा बाजवा यांचा सल्ला इम्रान खान यांनी धुडकावून लावला होता. त्यामुळे इम्रान खान आणि लष्करादरम्यान दरी दिसून आली होती.
इम्रान खान यांनी पक्षातील बंडखोरांविरुद्ध कारवाईची मागणी करत कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या पक्षाचे नेते अविश्वास प्रस्तावादरम्यान त्यांच्याविरुद्ध मतदान करू शकतात अशी भीती त्यांच्या मनात आहे. इम्रान खान यांच्याविरुद्ध मतदान करू पाहणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या खासदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी पीटीआयने याचिकेत केली आहे.
पाकिस्तानच्या संसदेत ३४२ खासदार आहेत. यामध्ये पीटीआयचे फक्त १५५ सदस्य आहेत. एमक्यूएम-पी (७), बीएपी (५), पीएमएल(क्यू) (५), जीडीए (३), एएमएल (१) जेडब्ल्यूपी (१) आणि अपक्ष (२) यासारख्या पक्षांवर इम्रान खान यांचे भवितव्य अवलंबून आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांना ३४२ पैकी किमान १७२ मत आवश्यक आहेत. विरोधी पक्षांकडे १६२ मत आहेत. जवळपास दोन डझन खासदारांनी इम्रान खानविरुद्ध मतदान करण्याची धमकी दिली आहे.