इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता डळमळीत झाली आहे. पाकिस्तानी संसदेत रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे, यामध्ये सत्तांतर निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
त्यापूर्वीच पाकिस्तानी लष्कर अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा सुपरपीएमच्या भूमिकेत आले आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक नेत्यांप्रमाणे त्यांनी सुद्धा काश्मीरचा राग आळवला आहे. काश्मीरसह इतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये सुरक्षा चर्चेदरम्यान जनरल बाजवा बोलत होते. गेल्या वर्षीसुद्धा जनरल बाजवा यांनी याच कार्यक्रामात असेच वक्तव्य केले होते. भारत आणि पाकिस्तानने भूतकाळ गाडून पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले होते.
“काश्मीर प्रश्नासह इतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर पाकिस्तानचा विश्वास आहे. भारत यासाठी तयार झाला तर पाकिस्तान पुढे जाण्यासाठी तयार आहे”, असे बाजवा यांच्या हवाल्याने डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे.
“या क्षणाला प्रदेशात राजकीय नेतृत्वाला आपले भावनात्मक आणि वैचारिक पूर्वाग्रह आणि इतिहासाचे बंधन तोडून टाकण्याची वेळ आली आहे. जेणेकरून या क्षेत्रातील जवळपास ३ अब्ज नागरिकांना शांतता आणि समृद्धी मिळू शकेल”, असे बाजवा यांनी सांगितले.
दरम्यान, सर्व प्रलंबित मुद्दे सोडवून भारतासह सर्व शेजारील देशांसोबत परस्पर फायदेशीर संबंध ठेवण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, असे पाकिस्तानने गेल्या महिन्यात म्हटले होते. या प्रदेशात स्थायी शांतता आणि स्थिरतेसाठी प्रमुख मुद्द्यांवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असे पाकिस्तानचे दिल्लीतील प्रभारी आफताब हसन यांनी म्हटले होते.









