इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान पायउतार झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट)चे अध्यक्ष शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. शाहबाज शरीफ यांनी २३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. शाहबाज शरीफ यांच्या खासगी जीवनातही आता नागरिक रस घेत आहेत. मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या शाहबाज शरीफ यांच्यापूर्वी त्यांचे भाऊ नवाज शरीफ हेसुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. शाहबाज शरीफ यांच्या खासगी जीवनाबद्दल इतकी चर्चा का होत आहे, हे जाणून घेऊया….
पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, शाहबाज शरीफ यांचे एकूण पाच विवाह झाले आहेत. पहिला विवाह करण्यासाठी त्यांना वडिलांकडून परवानगी मिळाली नव्हती. परंतु १९७३ मध्ये २३ वर्षांचे असताना त्यांनी नुसरत शाहबाज यांच्याशी विवाह केला होता. त्या विवाहातून त्यांना पाच मुले झाली. पहिल्या विवाहातून जन्म झालेला एक मुलगा हमजा शरीफ सध्या पंजाब प्रांतात कुटुंबाचा वारसा सांभाळत आहे. तर, दुसरा मुलगा सुलमान व्यावसायिक आहे.
शाहबाज शरीफ यांनी १९९३ मध्ये ४३ वर्षांचे असताना दुसरा विवाह आलिया हनी यांच्याशी केला. त्यातून त्यांना एक मुलगी खदिजा हिचा जन्म झाला. परंतु नंतर त्यांनी दुसऱ्या पत्नीला तलाक दिला. हा विवाह १९९४ पर्यंत टिकू शकला. दरम्यान, १९९३ मध्ये शाहबाज यांनी निलोफर खोसा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर शाहबाज यांनी २००३ मध्ये तेहमिना दुर्रानी यांच्याशी लपूनछपून विवाह केला. २०१२ मध्ये शाहबाज यांनी कलसुम हयी यांच्याशी गुप्तपणे निकाह केला.
एकूणच शाहबाज शरीफ यांनी पाच वेळा विवाह केला आहे. ते सध्या नुसरत आणि तेहमिना दुर्रानी यांच्यासोबत राहतात. शाहबाज यांनी उर्वरित आलिया हनी, निलोफर खोसा आणि कुलसुम हई या तीन पत्नींना तलाक दिला आहे. पत्नी आलिया हनी यांना घरी पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून शाहबाज यांनी पंजाबमध्ये एक उड्डाणपूल तयार केला. त्याला ‘हनी ब्रीज’ असे म्हटले जाते.
शाहबाज शरीफ आणि लेखिका, कादंबरीकार तेहमिना दुर्रानी यांच्या विवाहाबद्दल बरीच चर्चा झाली होती. शाहबाज आणि तेहमिना यांचे आठ वर्षे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी लपूनछपून विवाह केला होता, असे पाकिस्तानी माध्यमांमध्ये बोलले जात आहे. शाहबाज यांनी हा विवाह केल्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेते आश्चर्यचकित झाले होते. या विवाहाबद्दल त्यांनी कुटुंबीयांनाही काहीच सांगितले नव्हते.
शाहबाज शरीफ यांनी कर्करोगावर मात केली आहे. ते खूप नियम आणि रितीरिवाजानुसार राहतात. पाकिस्तानातील सर्वात महत्त्वाचा प्रांत मानल्या जाणाऱ्या पंजाब प्रांताचे त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे. सर्व अडथळे पार करत शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत.