इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने घेतलेली उसळी आणि सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या नव्या कर धोरणांमुळे महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील मंत्री अली अमीन गंडापूर यांनी नागरिकांना चहामध्ये कमी साखर टाका आणि पोळ्या कमी खा, असा विचित्र सल्ला दिला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एका सभेत अली बोलत होते.
पाकिस्तानव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील संघीय मंत्री अली अमीन गंडापूर यांनी पाकिस्तानात महागाईवर सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, जर मी चहामध्ये साखरेचे शंभर दाणे टाकतो. तर नऊ दाणे कमी टाकले तर माझा चहा कमी गोड होईल का? मी पोळीचे शंभर घास खात असेल तर नऊ घास कमी खाऊ शकत नाही का? मी आपल्या देशासाठी, आपल्या आत्मनिर्भरतेसाठी इतका त्याग करू शकत नाही का?
सोशल मीडियावर त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कठोर शब्दात टीका सुरू झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे (पीटीआय)चे नॅशनल असेंबलीचे सदस्य रियाज फतयाना यांनीसुद्धा असाच सल्ला दिला होता. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही पाकिस्तानच्या जनतेला जेवण कमी करण्याबाबत सल्ला दिला होता. पाकिस्तानने १९९८ मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यादरम्यान अमेरिका आणि जगातील इतर देश पाकिस्तानवर कठोर निर्बंध घालतील, असे सांगत त्यांनी एक वेळ जेवण करण्यासाठी तयार राहा. या कठिण काळात मी तुमच्या सोबत आहे, असे आवाहन शरीफ यांनी जनतेला केले होते.