मुंबई – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) चांगलेच फटकारले आहे. ओआयसीला भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा कोणताच अधिकार नाही, असे भारताने म्हटले आहे. ओआयसीने पाकिस्तानच्या ताब्यात राहून स्वतःला बंदी करून घेतले आहे. जिनेव्हामध्ये भारताच्या स्थायी मोहिमेतील अधिकारी पवन यांनी भारताचे म्हणणे परिषदेत मांडले.
पाकिस्तान आणि आयओसीकडून काश्मीर मुद्द्यावर हास्यास्पद वक्तव्य केल्यानंतर भारताने त्यांना जोरदार फटकारले आहे. मानवाधिकार परिषदेला ही गोष्ट ठाऊक आहे की, पाकिस्तान मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे. त्यांनी भारताच्या भूभागाचा ताबा घेतला आहे. पाकिस्तान अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यास अयशस्वी ठरला आहे. हिंदू, शिख, ख्रिश्चन, अहमदियासारख्या समाजाशी पाकिस्तानचे वर्तन जगापासून लपून राहिलेले नाही. पाकिस्तानात चुकीच्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणार्या पत्रकारांसोबत चांगली वर्तणूक केली जात नाही.
यूएनएचआरसीच्या ४८ व्या बैठकीत भारताने म्हटले की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण, पैशांनी मदत करत असल्याचे जगभरातील देशांना ठाऊक आहे. या मंचाचा दुरुपयोग करत पाकिस्तान भारतविरोधी खोटा आणि वाईट भावनेतून प्रचार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखले जाते. दहशतवाद पसरविणार्या पाकिस्तानसारख्या अयशस्वी देशांकडून कोणताही धडा घेण्याची भारताला गरज नाही.
काश्मीर मुद्यावर ओआयसीने केलेल्या वक्तव्याला भारताने पूर्णपणे फेटाळले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान आपला अजेंडा राबविण्यासाठी ओआयसीचा वापर करत आहे. त्यामुळे पाकिस्तानला असे करू द्यावे की नाही हे ओआयसी देशांनी ठरवावे, असे भारताने स्पष्ट केले आहे.