नवी दिल्ली – आपले सख्ये शेजारी राष्ट्र पाकिस्तानमधील आर्थिक संकटाची स्थिती पुन्हा एकदा समोर आली. दैनंदिन अन्नाची अत्यावश्यक गरज असलेल्या दूध आणि साखरेची किंमतही येथे पेट्रोलपेक्षाही खूप जास्त आहे. वाढता महागाई दर, परकीय चलनाचा साठा कमी होत चालला आहे, सरकारी वित्त खात्यातील तुटीवरचा वाढता दबाव आणि पाकिस्तानी चलन ‘रुपया’ची बिघडत चाललेली परिस्थिती यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली होती. तर सप्टेंबरमध्ये मोहरमच्या काळात कराचीमध्ये दूध १४० रुपये लिटरने विकले जात होते, तेव्हा पेट्रोलचे दर ११३ रुपये होते.
पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार न दिल्याचे प्रकरण समोर आले असून या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दूतावासाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही माहिती जगभरात कळल्याचे सांगण्यात येते, तथापि, दक्षिण आशियाई देशांच्या स्थितीचे वर्णन करणारी आकडेवारी या संपूर्ण प्रदेशात पाकिस्तानचा महागाई दर सर्वाधिक असल्याचे दर्शवित आहे.
एशियन डेव्हलपमेंट आउटलुकच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा महागाई तथा चलनवाढीचा दर या वर्षी ८.९ टक्के आहे, जो या क्षेत्रातील आठ देशांमध्ये सर्वाधिक आहे. तसेच यात भारत ५.५ टक्के, बांगलादेश ५.६ टक्के, भूतान ८.२ टक्के, अफगाणिस्तान ५ टक्के, मालदीव २.५ टक्के नेपाळ ३.६ टक्के आणि श्रीलंका यांचा महागाई दर ५.१ टक्के असा आहे. तसेच या अहवालातून असे दिसून आले आहे की, पाकिस्तानचा महागाई दर पुढील वर्षी कमी होईल, परंतु त्या स्थितीतही तो संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रातील सर्वाधिक महागाईचा देश राहील.
ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली होती. तर मागील महिन्यात पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, त्यांच्याकडे देश चालवण्यासाठी पैसे नाहीत आणि कर्ज वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत पाकिस्तानचे कर्ज ६ हजार ट्रिलियन रुपयांवरून ३० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या चलनवाढीच्या दरात जबरदस्त उडी होती, नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर ११.५ टक्क्यांवर पोहोचला होता, तर ऑक्टोबरमध्ये ९.२ टक्के होता.
सरकारी आकडेवारीनुसार, देशात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत २,५६० रुपये आहे, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत ९,८४७ रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोल १४६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १४३ रुपये प्रति लीटर अशी स्थिती आहे. दैनंदिन अन्नाची अत्यावश्यक गरज असलेल्या दूध आणि साखरेची किंमतही येथे खूप जास्त आहे. सप्टेंबरमध्ये मोहरमच्या काळात कराचीमध्ये दूध १४० रुपये लिटरने विकले जात होते, तेव्हा पेट्रोलचे दर ११३ रुपये होते.