इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका साध्या गेमच्या माध्यमातून ओळख होणे, त्यातून प्रेमाचे धागे जुळणे आणि आपल्या प्रेमासाठी सीमा ओलांडून एका पाकिस्तानी महिलेचे चार मुलांसह भारतात येणे, अद्याप भारतीयांच्या तरी पचनी पडलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याचा दावा सोशल मिडिया विद्यापीठाने केला आहे.
संपूर्ण जगात भारत आणि पाकिस्तानवर चित्रपटांचा सर्वाधिक प्रभाव आहे. कुठल्याही घटनेमध्ये सीनेमॅटिक अँगल शोधणे आणि त्यानुसार आपले मत तयार करण्यात आपण पटाईत आहोत. खरे तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून अनधिकृतरित्या भारतात प्रवेश करणारी सीमा हैदर आणि तिच्या चार मुलांच्या संदर्भात तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत. ते आपले काम करीत असून सगळ्या गोष्टींच्या खोलात जात आहेत. मात्र त्यापूर्वीच सोशल मिडियावर सीमा हैदर ही मुळात सामिया रहमान आहे आणि ती पाकिस्तावनी लष्करात आहे, असा दावा सोशल मिडियावरून करण्यात येत आहे.
सीमा आणि सामिया यांचे फोटो व्हायरल करण्यात आले आहे. दोघींच्याही फोटोंमध्ये बराच फरक आहे. मुख्य म्हणजे सामिया रहमान नावाची पाकिस्तानी लष्कर अधिकारी अस्तित्वात आहे आणि तिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे, हे स्पष्ट आहे. पण सीमा हैदरचे भारतात येणे हा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा एक भाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ही शंका व्यक्त होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच तिची कसून चौकशी सुरू आहे. पण, त्यासाठी चुकीच्या गोष्टींचा आधार सोशल मिडियावर घेतला जात आहे.
सचिनसाठी आली भारतात
दिल्लीतील २२ वर्षीय सचिन आणि पाकिस्तानात राहणारी २७ वर्षीय सीमा हैदर यांची पबजी गेमच्या माध्यमातून ओळख झाली. दोघांमध्ये ऑनलाईनच प्रेमाचे अंकूर फुटू लागले. सीमा हैदरचा चार मुले आहेत आणि तिचा नवरा तिला सतत मारहाण करतो आणि बहुतांश आखाती देशांमध्ये असतो. त्यामुळे सीमाने दोन वर्षे दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि ती मुलांसोबत अनधिकृतरित्या नेपाळमार्गे थेट दिल्लीत दाखल झाली. हंदू धर्म स्वीकारून तिने सचिनसोबत लग्नही केले. तिच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसल्यामुळे तिची कसून चौकशी होत आहे.