इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात आता राजकीय संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण विरोधी पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी दोन डझनहून अधिक पीटीआयच्या खासदारांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टी (पीटीआय)चे सरकार अडचणीत आले आहे.
मतदानापूर्वी सरकारकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भीतीने दोन डझन बंडखोर पीटीआयच्या खासदारांनी सिंध हाउस येथे मुक्काम ठोकला आहे. दुसरीकडे सत्ताधारी पीटीआयने या खासदारांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान सरकारविरुद्ध समोर आलेल्या खासदारांपैकी दोन खासदार राजा रियाज आणि मलिक नवाब शेर बशीर यांनी आपल्या अंतरात्माच्या आवाजावर मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे पाकिस्तान सरकार आपल्या खासदारांना धमकावत असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद (पीएमएल-क्यू) पक्षाचे नेते तारिक बशीर चिमा यांनी केला आहे. सरकारने त्यांच्या खासदारांना अविश्वास प्रस्तावादरम्यान सरकारविरुद्ध मतदान न करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे चिमा यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात संसदेच्या लॉजवर पोलिसांनी छापेमारी करून पीटीआय सरकार इस्लामाबादमधील सिंध हाउस येथे धाव घेण्याचे नियोजन करत आहे, असा दावा विरोधी पाकिस्तान पिपुल्स पार्टी (पीपीपी) ने केला आहे.
विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव अयशस्वी करण्यासाठी इस्लामाबादमधील सिंध हाउस घोडेबाजाराचे केंद्र बनू दिले जाणार नाही, असा निर्णय सत्ताधारी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पार्टीने निर्णय घेतला आहे. जियो न्यूजच्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांत्या अध्यक्षतेखाली पीटीआयची राजकीय प्रकरणांच्या समितीची बैठक झाली. या बैठकीत घोडेबाजार थांबविण्याच्या उद्देशाने सिंध हाउसवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीवरील सिंध प्रांतातील सत्ताधारी पीपीपी सरकारचे नियंत्रण आहे.