इस्लामाबाद – पाकिस्तानच्या इम्रान सरकारने आपल्या देशात बंदी घातलेल्या दहशतवादी गटावरील बंदी उठवून त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याचे मान्य केले आहे. परंतु त्यांना आता या गटाची भीती वाटू लागली आहे.
इम्रान सरकारने प्रतिबंधित तहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) सोबत करार केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून लाहोरपासून ते राजधानी इस्लामाबाद पर्यंतच्या रस्त्यांवर या गटाने गोंधळ घातला होता. गेल्या काही दिवसांपासून ही संघटना सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आता इम्रान सरकारने या संघटनेशी संबंधित 2 हजार दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करून त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याचे मान्य केले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानच्या रस्त्यावर टीएलपी हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे. सुरुवातीला इम्रान सरकारने संतापाच्या भरात या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले. यानंतर संघटनेचे प्रमुख रिझवी यांना अटक करण्यात आली. एवढेच नाही तर संघटनेशी संबंधित सुमारे अनेक जणांना तुरुंगात टाकण्यात आले. पण आता इम्रान खान सरकार हे सर्व सोडण्याच्या तयारीत आहे. या आंदोलनाच्या भीतीने पाक सरकारने असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सरकार आणि संघटना यांच्यात करार झाला आहे.
दोन्ही बाजूंच्या संवादकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले की, सरकारच्या उदारतेच्या बदल्यात पीएलपी पाकिस्तानमध्ये हिंसाचार करणार नाही. एवढेच नाही तर प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी फ्रान्सच्या राजदूताला देशाबाहेर पाठवण्याची अटही मागे घेणार आहे. या कराराअंतर्गत सरकार केवळ संघटनेशी संबंधित सर्वांना केवळ तुरुंगातून सोडणार नाही, तर हे लोक पाकिस्तानमध्ये निवडणूकही लढवू शकतील. पाकिस्तानात टीएलपीने केलेल्या हिंसाचार आणि जाळपोळीत सात पोलीस अधिकारी मारले गेले आणि शेकडो लोक जखमी झाले. टीएलपीने पूर्वेकडील लाहोर शहरापासून पाकिस्तानातील राजधानी इस्लामाबादपर्यंतच्या रस्त्यावर गोंधळ घातला. यावेळी हजारो टीएलपी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.