इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली आहे. वृत्तानुसार, इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली आहे. एका खटल्यात हजर राहण्यासाठी ते उच्च न्यायालयात गेले होते. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) १ मे रोजी इम्रानच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते.
इम्रान खान यांच्यावर १४० हून अधिक खटले सुरू आहेत. ते अनेक दिवसांपासून तोषखाना प्रकरणात अडकले होते. या प्रकरणातही त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, तोषखाना प्रकरणात इम्रानला अटक झाली नाही, तर इम्रान एवढ्या वाईटरित्या अडकलेल्या प्रकरणात काय आहे? काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण? यात इम्रान यांची पत्नी बुशरा बीवीची भूमिका काय आहे? चला जाणून घेऊया…
वास्तविक, हे प्रकरण अल कादिर ट्रस्ट विद्यापीठाशी संबंधित आहे. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) ने गेल्या बुधवारी इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीवी आणि इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयशी संबंधित अनेक नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
असा आरोप आहे की इम्रान खान, पंतप्रधान असताना, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर काही पीटीआय नेत्यांनी अल-कादिर विद्यापीठ प्रकल्प ट्रस्टची स्थापना केली होती. पंजाबमधील सोहावा जिल्ह्यातील झेलम येथे ‘दर्जेदार शिक्षण’ देण्यासाठी ‘अल-कादिर विद्यापीठ’ स्थापन करणे हा त्याचा उद्देश होता. ट्रस्टच्या कार्यालयाचा पत्ता ‘बनी गाला हाऊस, इस्लामाबाद’ असा उल्लेख आहे.
या विद्यापीठासाठी असलेल्या निवासी संकुलाची जमीन इम्रान आणि त्याच्या पत्नीने बेकायदेशीरपणे हडप केल्याचा आरोप आहे. यासाठी दोघांनी पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मलिक रियाझ यांना धमकीही दिली होती. इम्रानची पत्नी बुशरा बीबी हिने पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागितल्याची बाबही समोर आली आहे. याशिवाय माजी पंतप्रधान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर पीटीआय नेत्यांवरही राष्ट्रीय तिजोरीला १९० दशलक्ष पौंडांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
Pakistan Imran Khan Al Kadir Trust Scam