इस्लामाबाद – पाकिस्तान एक लोकशाही राष्ट्र नसून हुकूमशाही राष्ट्र असल्याची जाणीव काही वर्षात संपूर्ण जगाला झाली आहे. परंतु पाकिस्तान सरकार केवळ जनतेवरच जुलूम करत नाही, तर तेथील प्रसारमाध्यमांवर देखील आता दबाव आणत आहे, हे एका घटनेवरून सिद्ध झाले आहे. वास्तविक प्रसारमाध्यम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता माध्यमांवर दबाव आणण्यास सुरूवात केली आहे.
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि सैन्य आणि सरकारविरूद्ध प्रश्न विचारण्यासंबंधीच्या बातम्या चॅनलवर वाचण्यास बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजसाठी काम करणारा हमीद मीर हा ज्येष्ठ पत्रकार काही दिवसांपासून दुसर्या एका पत्रकाराच्या अटकेविरोधात आवाज उठवत होता.
काही दिवसांपूर्वी त्याने मोर्चाचे नेतृत्वही केले होते, त्यावेळी त्याने अनेक लोकांसमवेत इम्रान खान सरकार आणि सैन्याविरूद्ध तीव्र निवेदने दिली होती. त्यानंतर आता पत्रकार हमीद मीर यांना एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या लोकप्रिय टॉक शोचे अँकरिंग करण्यास मनाई केली आहे. मीर हा ‘जिओ टीव्ही’ वर प्राइम टाइम ‘कॅपिटल टॉक’ शो होस्ट असून त्याला या टीव्ही नेटवर्कद्वारे रजेवर पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, हमीद मीरच्या कुटुंबीयांना धमकी दिली जात आहे. तर हमीद मीर म्हणाले की, मला जिवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला गेला, पण मी यातून वाचलो असून माझ्यासाठी हे काही नवीन नाही. यापूर्वीही माझ्यावर दोनदा बंदी घातली गेली आहे. तसेच मी दोनदा नोकरी गमावली आहे. पाकीस्तानी राज्य घटनेने जनतेला दिलेल्या अधिकारांसाठी सरकारविरुद्ध आवाज उठविणे थांबवू शकत नाही.
हमीद मीर यांच्या कार्यक्रमावर घातलेल्या निर्बंधांविरोधात अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी आवाज उठविला आहे. मात्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही विधान करण्यात आलेले नाही, परंतु पत्रकार संघटना आणि इतरांनी या निर्णयावर टीका केली असून निवेदने दिली आहेत. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगानेही सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.