इस्लामाबाद – अखंड भारतातील अनेक हिंदू मंदिरे पाकिस्तानात गेली. पण फाळणीनंतर पाकड्यांनी या सर्व मंदिरांची तोडफोड केली. अनेक मंदिरे आजही पाकव्याप्त काश्मिरमध्ये भग्नावस्थेत बघायला मिळतात. अर्थात आजही काही मंदिरे, धर्मशाळा सुसिस्थित आहेत. पण पाकड्यांची त्यावर वाईट नजर आहे. मात्र पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने धर्मशाळा या हिंदूंच्या धार्मिक स्थळावरील अतिक्रमण खपवून घेणार नाही, असा दम देत त्यावरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानमध्ये हिंदूंचा हा मोठा विजय मानला जात आहे. पाक सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात हिंदू धार्मिक स्थळे पाडण्याचे व तेथे अतिक्रमण करण्याचे काम सुरू होते. या सर्व कारभाराला अर्थातच पाक सरकारचा पाठिंबा असतो. त्यात धर्मशाळाच्या निमित्ताने सरकारलाही दणका बसला आहे. पाकिस्तानातील ही धर्मशाळा जवळपास साडेसहा हजार चौरस फुट परिसरात आहे. पाकिस्तानातील कट्टरवाद्यांनी धर्मशाळा पाडून त्याठिकाणी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनविण्याचे मनसुबे बाळगले आहेत. त्याविरोधात पाकिस्तान हिंदू काऊन्सिलचे संरक्षक डॉ. रमेश कुमार वंकवानी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
गेल्या वर्षी ३० डिसेंबरला याच जागेवर जवळपास १०० स्थानिकांनी हल्ला चढवून धर्मशाळेची नासधूस केली. बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी असलेल्या भाविकांना मारहाण केली. एवढेच नाही तर आगही लावली. यापूर्वीही असे प्रयत्न अनेकदा झाले आहे. या जागेवर हिंदू संतांची समाधी आहे. इथे दररोज भाविक येत असतात.
न्या. गुलजार अहमद यांच्या नेतृत्वातील खंडपिठाने सिंधच्या सचिवांना संबंधित धार्मिक स्थळाच्या बाबतीत सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय डिसेंबरमधील घटनेच्या चौकशीचे तसेच केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कराचीच्या आयुक्तांना हे स्थळ आपल्या ताब्यात घेण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी ही वास्तू हेरिटेज अंतर्गत समाविष्ट करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.