लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गेल्या आठवड्यात जमावाच्या हल्ल्यात एका हिंदू मंदिराची नासधूस झाली होती. या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकरणी ९० लोकांना अटक करण्यात आली आहे. पंजाब प्रांताच्या रहीम यार खान जिल्ह्याच्या भोंग परिसरात बुधवारी गणेश मंदिरावर जमावाने हल्ला केला होता. एका स्थानिक मदरशाला कथितरित्या अपवित्र केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या आठ वर्षीय हिंदू मुलाची न्यायालयाने सुटका केली. याच्या विरोधातून हा हल्ला करण्यात आला होता.
हल्लेखोरांनी मूर्ती, मंदिराच्या भिंती आणि दरवाजाचे नुकसान केले होते. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान दंड संहिते अंतर्गत १५० हून अधिक लोकांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. जिल्ह्याचे पोलिस अधिकारी असद सरफराज यांनी पीटीआयला सांगितले, की सरकारने मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून मंदिर स्थानिक हिंदू समजाच्या लोकांकडे सुपूर्द केले आहे. आता मंदिर पूजेसाठी तयार आहे.
व्हिडिओ फुटेजच्या मदतीने एकूण ९० संशयितांना अटक करून न्यायालसमोर उभे करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयितांनाही अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हैदराबाद येथील शिल्पकारांना देवाच्या मूर्ती बनविण्याचे काम सुपूर्द केले आहे. हा हल्ला लाजीरवाणा असल्याचे सांगत पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी निषेध केला होता. सत्तारूढ बलुचिस्तान आवामी पार्टीच्या हिंदू समाजाचे एक नेते दानिश कुमार यांनी हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यकांविरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.