जिनिव्हा – पाकिस्तान नेहमीच भारतावर आगपाखड करत असतो. तसेच आपल्या उणिवा आणि दोष झाकण्यासाठी भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आसरा देत असतो. या कारस्थानाबद्दल भारताने वेळोवेळी पाकिस्तानची चांगलीच कान उघाडणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीतही पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना सहारा देऊन मदतच करत नाही, तर आर्थिक रूपात पेन्शन देखील देत असल्याचा आरोप भारताने केला असून याबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकला चांगलेच फटकारले आहे.
खतरनाक आणि आंतरराष्ट्रीय काळ्या यादीतील दहशतवाद्यांना निवृत्तीवेतन व निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल पाकिस्तानची निंदा करत भारताने म्हटले आहे की, दहशतवादाला मदत करण्यासाठी इस्लामाबाद सरकारला थेट जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. याबाबत मानवाधिकार परिषदेच्या ४७ व्या अधिवेशनात पाकिस्तानवर टीका करताना भारतीय प्रतिनिधी पवनकुमार बधे म्हणाले की, जगातील दहशतवादाचा धोका हा मानवाधिकारांमधील सर्वात गंभीर उल्लंघन आहे आणि सर्व प्रकारांवर कठोरपणे कारवाई केली जावी.
बधे पुढे म्हणाले, पाकिस्तानने आपल्या अधिकृत धोरणानुसार भयानक आणि सूचीबद्ध दहशतवाद्यांना पेन्शन देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. तो आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देतो. पाकिस्तानने पुन्हा एकदा या व्यासपीठाचा भारतावर बेजबाबदार आरोप करण्यासाठी वापर केला आहे. देशातील मानवाधिकार उल्लंघनाच्या गंभीर परिस्थितीपासून परिषदेचे लक्ष हटविणे हा त्यामागचा हेतू आहे.
पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची घटती लोकसंख्या ही त्यांच्या दुर्दशेचे थेट उदाहरण आहे. सक्तीने धर्मांतरण ही पाकिस्तानमधील दैनंदिन गोष्ट बनली आहे. काही गुप्त अहवालानुसार पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक अल्पवयीन मुलींचे अपहरण केले जाते आणि बलात्कार केला जातो. मग त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्यावर त्यांचे लग्न केले जाते. दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील एक हजाराहून अधिक मुलींचे धर्मांतर केले जाते, ही भयानक वाईट आणि दुदैवी बाब आहे.