इस्लामाबाद – पाकिस्तानचे दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची झळ अर्थातच तेथील सर्वसामान्य माणसाला पोहोचत आहे. मात्र आता थेट पंतप्रधानाच्याच पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याच्या सरकारी बंगल्याला रिअल इस्टेट क्षेत्रासाठी भाड्याने देण्याचा फतवा काढण्यात आला आहे.
अत्यंत भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आता पंतप्रधानाच्या बंगल्याला भाड्याने देण्याची घोषणा केली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थानाचे एका विद्यापीठात रुपांतर करण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली होती. आता त्यावर अंमलबजावणी होणार असल्याने इम्रान खानने घर तर रिकामे केले. पण इम्रान बाहेर पडताच योजनेत बदल करण्यात आला आहे.
आता या जागेतून कमाई करण्याच्या उद्देशाने ते भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटने यापूर्वी सांगितले होते की, पंतप्रधानांचे निवासस्थान एका शिक्षण संस्थेत रुपांतरित होईल. मात्र स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही जागा आता सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर अंमल करण्यासाठी दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
२०१९ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री शफकत महमूद यांनी सांगितले होते की, पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या देखभालीचा खर्च ४ कोटी ७० लाख रुपये होता. त्यामुळे इम्रानने घर रिकामे करून ते एका शिक्षण संस्थेला देण्याचे आदेश दिले होते. लाहोर येथे गव्हर्नर हाऊसला संग्रहालय आणि आर्ट गॅलरीत रुपांतरित करण्यात येणार आहे. तर मुर्री येथे पंजाब हाऊसला पर्यटक परिसर म्हणून वापरण्यात येईल.
अर्थव्यवस्थेचे बेहाल
पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून बेहाल झाली आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात व्यापार घटलेला आहे. त्यामुळे निर्यात कमी आणि आयात वाढलेली आहे.