इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्र सरकार आचारसंहिता लागेपर्यंत कोणते धक्के देणार हे वेळच सांगणार आहे. चार दिवसांपूर्वी वन नेशन वन इलेक्शनचा नारा देत संसदेचे विशेष सत्र बोलावले. आणि आता ‘इंडिया’ हे नाव वगळून देशाचे अधिकृत नाव ‘भारत’ हेच ठेवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. मात्र असे झाल्यास पाकिस्तान ‘इंडिया’ या नावावर दावा करण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.
भारतीय राज्यघटनेत ‘इंडिया दॅट इज भारत…’ असs नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे अधिकृत आहेत. तर, इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुनी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. घटनेत इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं असतील तर दोन्हीपैकी कुठलंही नाव सरकार, राष्ट्रपती वापरू शकतात. हा केवळ इंडिया ऐवजी भारत या शब्दाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न आहे की इंडिया हे नावच हटवायचं आहे हे अजून स्पष्ट नाही. पण इंडिया हा शब्द घटनेतून वगळायचाच असेल तर त्यासाठी घटनादुरुस्ती मात्र करावी लागणार आहे.
पण पाकिस्तान ‘इंडिया’ हे नाव घेण्याची शक्यता साऊथ एशिया इंडेक्स यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने देशाचे नाव बदलल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातही इंडिया ऐवजी भारत असे नाव बदलावे लागणार आहे. असे झाल्यास पाकिस्तान हे इंडिया या नावावर दावा करणार असून तशी तयारी केली असल्याचे वृत्त साऊथ एशिया इंडेक्सने प्रसिद्ध केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबरला डीनरचे आयोजन केले आहे. या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला. हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने घेतली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, खेळाडूंपासून कलाकार, सामान्य नागरीक अशा विविध घटकांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाकिस्तानचा दावा
पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी घटकांनी याआधीदेखील इंडिया हे नाव इंड्स प्रदेशावरून पडलं असल्याचे सांगत दावा केला होता. इंड्स हे नाव सिंधु नदीच्या खोऱ्यावरून पडले. त्याचेच पुढे इंड्सवरून इंडिया असे म्हटले जाऊ लागले. या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विविध मुद्दे मांडले आहेत. काहींनी पाकिस्तानची खिल्ली उडवली असून ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानचा दावा योग्य असल्याचेही काहींनी म्हटले आहे.