इस्लामाबाद – १९७१ साली गृहयुद्ध भडकून दोन तुकड्यात विभागल्या गेलेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा गृहयुद्ध भडकण्याचे संकेत मिळत आहेत. एशिया टाइम्समध्ये एका लेखात इरफान राजा यांनी पाकिस्तान पुन्हा गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे म्हटले असून, त्यात त्यांनी कारणेसुद्धा दिलेली आहेत. कोणत्याही प्रशासनात भ्रष्टाचार, गरिबी, प्रशासनाचे नियंत्रण नसणे आदी कारणांमुळे समाजात घृणा आणि हिंसाचाराची भावना भडकते. या सर्व कारणांमुळे पाकिस्तानात नोकरशाहीचे अंकुश राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इरफान राजा लिहितात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्याला देशद्रोही किंवा परदेशी एजंट म्हटले जाते, ही व्यवस्था संपूर्ण समाजात कायम झाली आहे. पाकिस्तान सुरक्षा संस्थांच्या ताब्यात असलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. विशेषतः बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात परिस्थिती अधिक चिघळलेली आहे.
अराजकता वाढली
लेखात म्हटले, देशात एकीकडे असमानता आणि गरिबी वाढत असताना दुसरीकडे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, जनरल आणि उद्योगपती अशा लोकांचा एक गट देशातच नव्हे, तर परदेशातही ऐशोआरामाचे जीवन जगत आहे. पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालणारे परवेझ मुशर्रफ त्याचेच उदाहरण आहे. असे लोक परदेशात सुखी जीवन जगत आहेत. या कारणांमुळे देशात अराजकता माजून गृहयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत.
पाक-चीन संबंध
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कराचीच्या अणूऊर्जा प्रकल्प-२ सुरू करण्याप्रसंगी सांगितले, चीन आणि पाकिस्तानचे संबंध आणखी दृढ होत आहेत. आजच्याच दिवशी पाकिस्तानचे चीनसोबतचे राजकीय संबंधांना ७० वर्षे झाली आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक संबंधातून विकासाचे नवे रस्ते खुले होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यालयात घुसखोरी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे पुत्र हसन शरीफ यांच्या लंडनमधील कार्यालयात चार लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी पूर्वनियोजित भेट होती, असे त्यांनी सांगितले. मात्र नंतर हे लोक पळून गेले. नवाज शरीफ यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला आहे, असा आरोप पीएमएल-नवाज पार्टीने केला आहे.