नवी दिल्ली – सायबर क्राईमच्या माध्यमातून जमा झालेला पैसा आरोपींच्या मार्फत पाकिस्तान आणि चीनमध्ये जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अर्थात पाकिस्तान आणि चीनमधील गुन्हेगार सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात सामील आहेत. तपास यंत्रणांना शंका आहे की देशातून सायबर क्राईमच्या माध्यमातून लुटण्यात आलेला पैसा दहशतवादाच्या मार्गे आपल्याच विरोधात वापरण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती कुणी दिलेली नाही, पण शक्यताही नाकारलेली नाही.
भोपाळच्या एका व्यापाराला मसाल्याच्या आनलाईन ट्रेडींगच्या नावावर लुटण्यात आले. मध्यप्रदेशातील राज्य सायबर सेलने याचा तपास लावला तेव्हा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम बाहेरच्या देशांमध्ये पोहोचविण्यात आल्याचे पुढे आले. यात पाकिस्तान आणि चीनच्या काही नागरिकांचाही मोठा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. ही फसवणूक सर्वसाधारण चोरीचे प्रकरण आहे की देशविरोधी कारवायांचा भाग आहे, याचा तपास लावला जात आहे.
केंद्रीय स्तरावरही याप्रकारच्या घटनांची दखल घेण्यात आली आहे. राज्य सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक योगेश चौधरी यांनी सांगितले की, आनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात पाकिस्तान आणि चीनच्या सहभागाचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. मात्र या पैश्यांच्या वापराबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही, असेही ते म्हणतात. गुरुग्राम, दिल्ली आणि राजकोटमधून चार लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
केमेन आयलंड मुख्य स्थान
आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांनी केमेन आयलंडला भारतातून फसवणूक करून गोळा केलेल्या पैश्यांसाठी मुख्य स्थान केले आहे. केमेन आयलंड येथे या पैश्यांचे हस्तांतरण होते. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम प्राप्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास ७० कोटी रुपये हस्तांतरीत झाल्याची शंका तपास यंत्रणेला आहे.