इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानातील उद्योजकाशी निकाह करून मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कबुल करणाऱ्या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील अंजू हीने घुमजाव केले आहे. तिने आता मुस्लिम धर्म स्वीकारला नसल्याचे सांगून नवीन ट्विस्ट आणला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंजू हीचे धर्मांतरण, तिला मिळणारी महागडी गिफ्ट चर्चेचा विषय ठरत आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पाकिस्तानातून महागडे गिफ्ट्स मिळत आहेत. अंजूने इस्लामचा स्वीकार केल्याने एका कथित उद्योजकाने तिला ४० लाखाचा फ्लॅट आणि चेकद्वारे मोठी रक्कम दिली आहे. त्यामुळे अंजू आणि नसरुल्लाह यांचा निकाह झाल्यावर शिक्कामोर्तब झाला होता. तिने निकाह करून इस्लाम धर्म स्वीकारल्यानेच तिला ही भेट मिळाल्याचे सांगितले जात होते. मात्र, अंजूने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे.
आपण निकाह केलाच नसल्याचा दावा अंजू हिने केला आहे. यावेळी तिने गिफ्ट्स आणि फ्लॅट्सबाबतही खुलासा केला आहे. मला भेटवस्तू मिळाल्या आहेत. पठाण लोक पाहुण्यांचे प्रचंड स्वागत करत असतात. त्यांचा आदर सत्कार करत असतात. त्यामुळे या भेटवस्तू त्यांच्याकडून मिळाल्या आहेत. बाकी दुसरे काही नाही. जसे दाखवले जात आहे, तसे काहीच नाही, असा दावाही तिने केला. मी पाकिस्तानात केवळ एका आठवड्यासाठी आले होते. मात्र, परिस्थिती अशी झाली की अजूनपर्यंत मला इथे थांबावे लागले. मी इथे व्यवस्थित आहे. मला काहीच अडचण नाहीये. माझा व्हिसा आहे. मी आरामात भारतात येईल. मी इथे येऊन काही गुन्हा केलेला नाही. सर्व लोक फिरायला येतात. पर्यटक कराची आणि लाहोर फिरायला येतात. तशीच मीही आले आहे. मी काही गुन्हा केलेला नाहीये, असेही तिचे म्हणणे आहे.
कुटुंबीय त्रस्त झाल्याची भावना
माझी मुलगी घाबरलेली आहे. सर्व त्रस्त झाले आहेत. माझे तिच्याशी बोलणे होत नाहीये. मीडिया जे काही दाखवत आहे, तसे काहीच नाहीये. निकाह केल्याचे वृत्त फेक आहे. मात्र, हे सर्व पाहून माझे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. माझ्याशी तेही बोलत नाहीये. माझी मुले घाबरलेली आहेत. त्यामुळेच त्यांच्याशी माझे बोलणे होत नाहीये, असे अंजू म्हणत आहे.