इस्लामाबाद – पाकिस्तान क्रिकेट सध्या कठिण परिस्थितीतून जात आहे. आधी न्यूझीलंड संघाने एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा दौरा रद्द केला आणि आता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सुद्धा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. इंग्लंडचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. परंतु सुरक्षेचे कारण देऊन त्यांनी माघार घेतली आहे. ईसीबीच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीझ राजा यांनी नाराजी व्यक्त करत दोन्ही देशांवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना धमकी दिली आहे.
क्रिकबज या संकेतस्थळाने रमीझ राजा यांचे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, आतापर्यंत टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत फक्त भारतच निशाण्यावर होता. परंतु आता आमच्या निशाण्यावर आणखी दोन संघ आले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांनी दौरा रद्द करून चांगले केले नाही. याचा बदला आम्ही मैदानावर घेणार आहोत. आमच्यासाठी हा मोठा धडा आहे. आम्ही जेव्हा या देशात प्रवास करतो तेव्हा कठोर विलगीकरणात राहावे लागते. आम्हाला त्यांचे सल्ले सहन करावे लागतात, असे रमीझ राजा म्हणाले. जेवढे आमच्या हितासाठी योग्य आहे, आम्ही तितकेच पुढे जाणार आहोत. तुम्ही सुरक्षेचा धोका आणि धारणेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ शकतात. आम्हाला प्रचंड राग आला होता. कारण, आधी न्यूझीलंडने धोक्याबाबत कोणतीही माहिती न देता दौर्यातून माघार घेतली आणि आता इंग्लंडनेही तेच केले. इंग्लंडबाबत असे घडण्याचा अंदाज आला होता, असे राजा यांनी सांगितले. इंग्लंडचा महिला आणि पुरुषांचा क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत रावळपिंडीमध्ये १३ आणि १४ ऑक्टोबरला दोन टी-ट्वेंटी सामने खेळणार होते. इंग्लिश महिला संघाला १७, १९ आणि २१ ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळायची होती.