काबूल – तालिबान या दहशतावादी संघटनेशी पाकिस्तानशी असलेले संबंध आता लपून राहिलेले नाहीत. त्यांच्यामधील घनिष्ट संबंधांचा आता आणखी एक पुरावा मिळाला आहे. अफगाणिस्तानातील पंजशीर भागात स्थानिक बंडखोरांकडून तालिबानला आव्हान मिळाल्यानंतर तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तान पोहोचला आहे. तिथे पाकिस्तानच्या ड्रोननी स्मार्ट बॉम्बचा वापर करून पंजशीरवर बॉम्बवर्षाव केला आहे, असे माजी खासदार अरियनजद यांच्या हवाल्याने आमजन न्यूजने सांगितले.
पाकिस्तानच्या हवाई दलाने बलुचिस्तानमध्ये अफगाणिस्तानशी लागून असलेल्या सीमेवर एक हवाईदलाचे तळ सक्रिय केले आहे. कोटली आणि रावलकोटमध्ये भारतीय सरदहद्दीच्या परिसरात दोन उपग्रह अड्ड्यांनाही सक्रिय राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार्यांच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तानी हवाई दलाकडे १२-१२ सक्रिय हवाई दलाचे तसेच उपग्रहाचे अड्डे आहेत. पाकिस्तानकडून या अड्ड्यांना वेळोवेळी सक्रिय राहण्याचे निर्देश दिले जातात. फेब्रुवारी २०१९मध्ये बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून हवाई दल अड्ड्यांना सक्रिय करण्याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानच्या हवाईदलाचे सर्व अड्डे भारतीय हवाई दलाच्या रडारवर आहेत. तेथील हालचालींवर भारताचे नेहमीच लक्ष असते. दरम्यान, पाकिस्तानची आयएसएआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख फैज हमीद यांच्यासह वरिष्ठ प्रतिनिधी दलाने तालिबानच्या नेत्यांची नुकतीच भेट घेतली होती. संरक्षण आणि सीमा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. त्यांच्या दौ-यानंतरच पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरमध्ये बॉम्बहल्ले केले आहेत.