मुंबई – अफगाणिस्तानात सैन्यावर आणि सामान्य लोकांवर हल्ले करणाऱ्या तालिबान्यांसोबत पाकिस्तानने आधार दिलेल्या २१ दहशतवादी संघटनांचाही सहभाग आहे. या सर्व संघटना भारतविरोधी असून त्यांनी तालिबान्यांशी हात मिळविणे भारतासाठी धोकादायक मानले जात आहे. विशेषतः काश्मीरच्या बाबतीत भारताची चिंता वाढलेली आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींच्या विरोधात तेथील सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदजई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘तालिबान आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना एकमेकांच्या संपर्कात आहेत. अर्थात हा संपर्क जगापासून लपलेला नाही. गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तानात या संघटना वाढलेला आहेत. पाकिस्तानी सैन्यानेही त्यांना पूर्ण संरक्षण दिले आहे. आता अफगाणिस्तानातही तालिबान्यांसोबत २१ दहशतवादी संघटना सामील झाल्या आहेत. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यैबा यांचाही यात समावेश आहे.’
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सुद्धा ताश्कंदमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात याविषयावर माहिती दिली. १० हजार दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या मदतीसाठी घुसखोरी केली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानने पोसलेली लष्कर-ए-जांघवी, तहरिक-ए-तालिबान या संघटनांचे सदस्यही या लढाईत सामील झाले आहेत, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांना कळले आहे. पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेने या संघटनांना काही काळ शांत राहण्याचा सल्ला दिला होता, हे विशेष.
चीन सतर्क
या घडामोडींमुळे चीनही सतर्क झाला आहे. मात्र अद्याप चीनने यावर कुठलेही भाष्य केलेले नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुद्धा शांघाय येथे झालेल्या संमेलनात तालिबानच्या दहशतवादी कारवायांची गंभीर समस्या दुर्लक्षित करता येणार नाही, असे सांगितले होते.