कराची – शेजारील देश पाकिस्तानमध्ये सोमवारी (७ जून) सकाळी एका मोठा रेल्वे अपघात झाला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दोन रेल्वेंची टक्कर झाली. या अपघातात ३० लोकांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील वाहिनी ARY ने याबाबत माहिती दिली आहे.
रेडिओ पाकिस्तानने रेल्वे अधिकार्यांच्या माहितीवरून सांगितले, की घोटकी शहराजवळील रायती आणि ओबरो रेल्वे स्थानकादरम्यान सर सय्यद एक्स्प्रेस आणि मिल्लत एक्स्प्रेसची धडक झाली. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तविली आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असून, संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हा अपघात घोटकीजवळ झाला आहे. जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, मिल्लत एक्स्प्रेसच्या बोगी अनियंत्रित होऊन दुसर्या रेल्वेवर जाऊन आदळल्या. त्याचदरम्यान मिल्लत एक्स्प्रेसच्या ८ बोगी रेल्वेरूळावरून घसरल्या.
हा अपघात पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी झाला. अपघाताच्या चार तासांनंतरही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. अजूनही अनेक प्रवासी आतमध्ये फसलेले आहेत. अनेक प्रवाशांना रेल्वे बोगी कापूनच बाहेर काढावे लागेल अशी परिस्थिती आहे. जखमींना ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे रुग्णालयात नेले जात आहे. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून नेमकी किती जीवितहानी झाली आहे याची निश्चित माहिती मिळू शकेल.
https://twitter.com/Kd48720Danish/status/1401787830548852738