इस्लामाबाद – अफगाणिस्तानातून परदेशी सैनिक माघारी परतल्यानंतर पाकिस्तानला विविध चिंतांनी ग्रासले आहे. परदेशी सैनिकांना माघारी बोलावणे हा बेजबाबदार आणि अयोग्य निर्णय आहे. पाश्चिमात्य देश तालिबानशी संवाद साधण्यात अपयशी ठरले तर अफगाणिस्तानात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. जिओ न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. कुरेशी म्हणाले, की अफगाणिस्तानात अराजकता आणि दहशतवाद पुन्हा उभारी घेऊ शकतो. युद्ध समाप्त करण्याबाबतच्या पाकिस्तानच्या काळजीला बगल देऊन बेजबाबदारपणे सैनिकांना माघारी बोलावण्यात आले आहे.
कुरेशी म्हणाले, अफगाणिस्तानात अराजकता पसरू शकते. यामुळे अशा संघटना पुन्हा उभारी घेऊ शकतात ज्यांना आम्ही सगळेच घाबरतो. आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची मूळे अफगाणिस्तानात पुन्हा भक्कम होऊ देऊ नये. अफगाणिस्तानला एकटे सोडू नये. मागील चुकांची पुनरावृत्ती करणे आणि आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या युद्धग्रस्त देशाला एकटे सोडण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दिलेल्या आश्वासनांना नवे तालिबान पूर्ण करणार की नाही हे पाश्चिमात्य देशांनी आता सुनिश्चित करावे. तालिबानशी चर्चा झाली नाही, तर अफगाणिस्तानात गृहयुद्ध छेडले जाऊ शकते. त्यामुळे या भागात दहशतवादाची नवी लाटच निर्माण होऊ शकते. दरम्यान, कुरेशी यांनी यापूर्वी तालिबानचे कौतुक केले होते. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर युद्धामुळे जर्जर झालेल्या या देशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी कूटनिती करार एक सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले होते.