इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानमधून दिल्लीत दाखल झालेल्या सीमा हैदर हिच्यासोबत भारतीय तरुण सचिन याने मार्च महिन्यात नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिरात लग्न केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
दोघांचे लग्न झालेले असल्यामुळे त्यांच्या यापूर्वी देखील भेटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ४ जुलैला पाकिस्तानातून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात दाखल झाल्यानंतर एका वकिलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सीमा हैदरला ताब्यात घेतले. त्याचवेळी सचिनलाही ताब्यात घेतले. सीमा तिच्या चार मुलांसह दिल्लीत दाखल झाली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. तिने वय लपवल्याचा, सीमा सुरक्षा यंत्रणेसोबत खोटे बोलल्याचा देखील खुलासा झालेला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर दोघांचीही जामीनावर सुटका करण्यात आली. पण अचानक दोघेही गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलीस पुन्हा एकदा त्यांच्या मागावर होते. सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील सचिनच्या निवासस्थानावरून अटक केली. आता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून तिचा संपूर्ण प्रवास तपासला जाणार आहे. हनी ट्रॅपचाही एटीएसला संशय आलेला आहे. त्यामुळे आता एकूणच तपासाचा रोख बदललेला आहे.
वडिलांवरही गुन्हा
बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्यांना आश्रय दिल्याबद्दल सचिनचे वडील व सचिन या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन आणि सीमा हैदर यांची २०१९ पासून ओळख असून पबजी गेम खेळताना त्यांच्यात संबंध निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे.
तिघेही पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर, तिचा भारतीय प्रियकर सचिन आणि सचिनचे वडील या तिघांनाही एटीएसने ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथून ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक साध्या गणवेशात सचिनच्या घरी पोहोचले आणि त्यांनी कारवाई केली.